शिक्षणाचे महत्व आज संपूर्ण मानवजातीने ओळखले आहे. आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी, त्यांना चांगले नागरिक घडविण्यासाठी सर्वच पालक विशेष मेहनत घेतात. परंतु महागाईच्या जमान्यात आता शिक्षण देखील महागले आहे.
आर्थिक कारणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, ज्ञानापासून ते वंचित राहू नये यासाठी वेगवेगळ्या संस्था, सरकारे, विद्यापीठ व इतर आस्थापने शिष्यवृत्ती देत असतात. गरजू, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट असते.
परंतु अनेकदा सोशल मिडीयावर, युट्युबवर किंवा WhatsApp वर असे अनेक मेसेज किंवा व्हिडियो बघायला मिळतात, जिथे मोठमोठ्या रकमेची शिष्यवृत्ती उपलब्ध असल्याचे सांगितले जाते आणि गरजू विद्यार्थ्यांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे आकारून फसवणूक देखील केली जाते. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचे तपशील मागवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची काही उदाहरणे अलीकडच्या काळात घडली आहेत.
अशा प्रकारचे शिष्यवृत्तीसंबंधी घोटाळे आणि फसव्या शिष्यवृत्ती योजना ओळखण्यासाठी आणि टाळण्यासाठी आपण सगळ्यांनीच विशेष काळजी घेतली पाहिजे. चला तर या लेखात जाणून घेऊयात कशाप्रकारे तुम्ही बनावट, फसव्या शिष्यवृत्तीच्या जाहिराती ओळखू शकता आणि तुमची संभाव्य फसवणूक टाळू शकता.
Table of contents [Show]
संस्थेची संपूर्ण माहिती घ्या
कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी, शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्थेची संपूर्ण माहिती घ्या. सदर संस्थेची कायदेशीर नोंदणी आहे किंवा नाही, कुठल्या गैरव्यवहारात ती सामील तर नाही ना? अशा सर्व गोष्टींची माहिती करून घ्या. संस्थेसंदर्भात अलीकडच्या काळात बातम्यांमध्ये काही छापून आले आहे का हे तुम्ही गुगलवर देखील बघू शकता.
तसेच संस्थेची अधिकृत वेबसाईट तपासा, त्यावर दिलेली माहिती खरी आहे किंवा नाही याची देखील शहानिशा करा. संस्थेचा पत्ता, फोन नंबर, संस्थेचे संचालक आदींची माहिती देखील वाचून घ्या. संस्थेच्या माहितीत काही तफावत, अस्पष्टता जाणवल्यास वेळीच सावध व्हा आणि तुम्ही करत असलेली कारवाई थांबवा.
पात्रता निकष तपासून घ्या
कुठल्याही शिष्यवृत्तीसाठी विशेष पात्रता निकष असतात, जसे की शैक्षणिक पात्रता, आर्थिक स्थिती किंवा निवडलेला अभ्यासक्रम आदी. सरसकट कुणालाही शिष्यवृत्ती दिली जात नाही हे लक्षात असू द्या.
कुठलीही शिष्यवृत्ती प्रत्येकासाठी खुली असल्याचा दावा जर संस्था करत असेल किंवा पात्रतेबद्दल काहीही स्पष्टता दिली नसल्यास हा एक मोठा घोटाळा असू शकतो हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रतिष्ठित शिष्यवृत्तीचे निकष स्पष्टपणे नमूद केलेले असतात हे कायम लक्षात ठेवा.
अवास्तव आश्वासनांपासून सावधान
कुठलीही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती तुम्हांला अर्ज करतेवेळीच कुठलेही ठोस आश्वासन देत नाही. शिष्यवृत्ती देणारी संस्था केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांची आर्थिक गरज हे निकष बघत असते. तुम्हाला निधी मिळण्याची हमी जर कुठल्या शिष्यवृत्तीच्या जाहिरातीतून दिली जात असेल तर वेळीच सावध व्हा, हा एक घोटाळा असू शकतो.
बँकेचे तपशील देऊ नका
कुठल्याही प्रतिष्ठीत शिष्यवृत्तीसाठी जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा तुमच्याकडून केवळ शैक्षणिक दस्तऐवज मागितले जातात. जसे की मार्कशीट, मुख्याध्यापक किंवा प्राध्यापकांचे शिफारसपत्र आदी.
जर कुठल्या शिष्यवृत्ती अर्जात तुमच्याकडून तुमच्या बँकेचे तपशील, क्रेडीट किंवा डेबिट कार्डाचे तपशील आणि वैयक्तिक माहिती मागितली जात असेल तर सावध व्हा! हा एक स्कॅम असू शकतो आणि तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.
जाणकारांचा सल्ला घ्या
शिष्यवृत्ती मग ती भारतातील असो किंवा परदेशातील असो, घाईघाईत निर्णय अजिबात घेऊ नका. तुम्ही अर्ज करत असलेल्या शिष्यवृत्तीबद्दल त्या विषयांतील जाणकारांचे मत विचारात घ्या. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची तुम्ही यासाठी मदत घेऊ शकता. तसेच याआधी कुणी अशा शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता का, याची देखील माहिती घ्या. यावरून तुम्हांला शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्थेचा अंदाज येईल.
शिक्षणासाठी आर्थिक मदत शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ही एक मौल्यवान संधी असते. परंतु, शिष्यवृत्ती घोटाळ्यांबद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जागरूक असणे आणि फसव्या शिष्यवृत्ती योजनांना बळी पडू नये म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.