Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Travel Scams: भारतीय प्रवासी ठरतायेत ट्रॅव्हल स्कॅमचे शिकार; फसवणूक टाळण्यासाठी 'ही' काळजी घ्या

Online Travel Scams

सध्या सुट्ट्यांचा सिझन सुरू आहे. उन्हाचा कहर वाढत असल्याने फॅमिली किंवा मित्रांसोबत ट्रिपचे प्लॅनिंग जिकडेतिकडे जोरदार सुरू असल्याचं दिसून येत आहे. मात्र, ऑनलाइन तिकीट बुक करताना नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. तिकीट बुक करताना कोणती काळजी घ्यावी ते या लेखात वाचा.

Online Travel Scams: सध्या सुट्ट्यांचा सिझन सुरू आहे. उन्हाचा कहर वाढत असल्याने फॅमिली किंवा मित्रांसोबत ट्रिपचे प्लॅनिंग जिकडेतिकडे सुरू असल्याचं दिसून येत आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळे, समुद्र किनारे आणि वॉटर पार्क गर्दीने तुडुंब भरली आहेत. उन्हाळ्यामध्ये पर्यटन क्षेत्र डिमांडमध्ये असल्याने नागरिकांची फसवणूकही वाढली आहे.

ऑनलाइन तिकीट बुक करताना जास्त डिस्काउंट मिळावा म्हणून पर्यटक ऑफर्सच्या मागे धावतात. मात्र, पैसे वाचवण्याऐवजी गमावून बसत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 'Safer Holidays' असा ट्रॅव्हल अहवाल McAfee Corp ने तयार केला आहे. पीटीआय वृत्तवाहीनीने यासंबंधीत बातमी दिली आहे. कोरोनानंतर देशात पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, त्याच प्रमाणात ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाणही वाढल्याचे यात म्हटले आहे.

या अहवालाद्वारे 7 हजार नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले. (Online travel scam) यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. 51% सहभागींनी तिकीट बुक करताना ऑनलाइन घोटाळ्याला सामोरे गेल्याचे सांगितले. तर प्रवास सुरू होण्याआधी नकद पैसे चोरीला जाण्याचे आणि ऑनलाइन घोटाळ्याचे शिकार झाल्याचे 70% पेक्षा जास्त नागरिकांनी सांगितले.

भारतीयांची पहिली पसंती देशांतर्गत पर्यटनास असून त्यानंतर परदेशवारीचा विचार केला जातो. भारतीय नागरिक पर्यटनास जाताना हॉटेल, रिसॉर्ट, फ्लाइट, बसच्या तिकिटावर सर्वाधिक डिस्काउंट कोठे मिळतो याच्या सतत शोधात असतो. त्यासाठी नव्या ट्रॅव्हल वेबसाइटला व्हिजिट करतो. तसेच इंटरनेटवर नव्या पर्यटन स्थळांच्या शोधात असतो. मात्र, असे करताना वेबसाइटवरून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.

नागरिकांची माहिती चोरी

ऑनलाइन तिकीट बुक करताना 27% नागरिकांची चुकीच्या संकेतस्थळावरून पेमेंट होऊन फसवणूक झाली. तर 37% नागरिकांची आधार कार्ड, बँक डिटेल्स, फोन नंबर अशी संवेदनशील माहितीची चोरी झाली. त्यामुळे बनावट वेबसाइटकडे नागरिकांची माहिती मोठ्या प्रमाणावर जात असल्याचे दिसून येत आहे.

ऑनलाइन तिकिट बुक करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात

सार्वजनिक, असुरक्षित वायफायला कनेक्ट करुन इंटरनेटचा वापर करू नका

ऑफर्ससाठी कोणत्याही साइटवरच्या क्यूआर कोडला स्कॅन करू नका. त्याद्वारे तुमची माहिती चोरी होऊ शकते.

ट्रॅव्हल, हॉटेल बुकिंगसाठी वेबसाइटचा युआरएल अॅड्रेस तपासून घ्या. त्या साइटला सिक्युरिटी सर्टिफिकेट असेल तरच संवेदनशील माहिती शेअर करा. ही माहिती तुम्हाला युआरएलबार बारच्या डावीकडे मिळू शकते. तेथे कुलूपाचे (लॉक) चित्र असते त्यावर क्लिक करून सर्टिफिकेटची माहिती घ्या.

जास्त डिस्काउंट, फ्री ट्रॅव्हल, एकावर एक तिकिट फ्री अशा ऑफर्सपासून लांबच राहा. बऱ्याच वेळा या ऑफर्स बनावट असतात. खात्री केल्याशिवाय लिंकवर क्लिक करू नका.