सध्या डिजीटल पेमेंटचा (Digital payments) वापर अधिक होतोय. मात्र काहीवेळा रोख रक्कम असल्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही. यूपीआयच्या माध्यमातून अनेकजण व्यवहार करतात. मात्र आजही अनेकजण किंवा बहुतांश वर्ग हा रोखीनं व्यवहार करण्यास प्राधान्य देतो. एटीएम (Automated teller machine) मोठ्या प्रमाणावर सर्वत्र पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत रोख रक्कम उपलब्ध होणंही खूप सोपं जातं. पण सर्व बँकांनी एटीएममधून पैसे काढण्यासाठी काही नियम आखून दिलेत. काही मर्यादा घातल्या आहेत. म्हणजेच, तुम्ही एटीएममधून किती पैसे काढू शकता याबाबत वेगवेगळ्या बँकांचे स्वतःचे नियम आहेत. हे नियम नेमके कोणते, याविषयी जाणून घेऊ.
Table of contents [Show]
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे. आपल्या ग्राहकांना विविध वित्तीय उत्पादनं बँकेमार्फत ऑफर केली जातात. विविध प्रकारचे कार्डदेखील बँक प्रदान करते. या कार्ड्सवरची रोख रक्कम काढण्याची मर्यादा बदलू शकते. जसं की, क्लासिक डेबिट कार्ड किंवा मेस्ट्रो डेबिट कार्डमधून दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा 20,000 रुपये इतकी आहे. एसबीआयच्या प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड्सद्वारे एका दिवसात 1 लाख रुपये रोख काढता येवू शकतात. एसबीआय गो लिंक्ड आणि टच टॅप डेबिट कार्ड्सची मर्यादा 40,000 रुपये आहे. एसबीआय कार्डधारक मेट्रो शहरांमध्ये महिन्यातून 3 वेळा मोफत पैसे काढू शकतात. इतर शहरांमध्ये 5 विनामूल्य पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतर, तुम्हाला एसबीआय एटीएमवर 5 रुपये आणि नॉन-एसबीआय एटीएमवर 10 रुपये शुल्क भरावं लागतं.
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
पंजाब नॅशनल या सरकारी बँकेचे ग्राहक पीएनबी प्लॅटिनम डेबिट कार्डद्वारे दररोज 50,000 रुपये काढू शकतात. पीएनबी क्लासिक डेबिट कार्डशी जोडलेल्या खात्यातून जास्तीत जास्त 25,000 रुपये काढता येतात.गोल्ड डेबिट कार्डशी जोडलेल्या खात्यातून दररोज रोख रक्कम काढण्याची मर्यादा 50,000 रुपये इतकी आहे. ही बँकही मेट्रो शहरांमध्ये 3 विनामूल्य एटीएम विड्रॉवल तर इतर शहरांमध्ये 5 डेबिट कार्ड काढण्याची सुविधा देते. इतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 10 रुपये शुल्क आकारलं जातं.
एचडीएफसी (HDFC)
एचडीएफसी बँक डेबिट कार्ड ग्राहकांना पाच विनामूल्य व्यवहार करण्यास परवानगी देते. त्यानंतर शुल्क लागू होतं. परदेशी पैसे काढण्यासाठी 125 रुपये शुल्क आकारलं जातं. मिलेनिया (Millenia) डेबिट कार्डवर दैनंदिन रोख पैसे काढण्याची मर्यादा 50,000 हजार रुपये आहे. मनीबॅक डेबिट कार्डची मर्यादा 25,000 रुपये आहे तर रिवॉर्ड्स डेबिट कार्डमध्ये 50,000ची दैनिक रोख रक्कम काढण्याची मर्यादा आहे.
अॅक्सिस बँक (Axis bank)
अॅक्सिस बँकेत रोख रक्कम काढण्याची दररोजची मर्यादा 40,000 रुपये आहे. यामध्ये सर्व पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारलं जातं.
बँक ऑफ बडोदा (BoB)
बँक ऑफ बडोदाचं बीपीसीएल डेबिट कार्डद्वारे एका दिवसात 50,000 रुपये काढता येतात. मास्टरकार्ड डीआय प्लॅटिनम डेबिट कार्डच्या माध्यमातून 50,000 रुपये आणि मास्टरकार्ड क्लासिक डीआय डेबिट कार्डवरून 25,000 रुपये दररोज काढण्याची मर्यादा आहे.