• 28 Nov, 2022 17:48

घरपट्टी कशी आकारली जाते? ती कोण आकारतं?

Property Tax

घरपट्टी आकारणं हा सरकारचा अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महापालिकेतंर्गत वेगवेगळ्या दराने घरपट्टी आकारली जाते.

तुमचे स्वत:चे घर असेल तर तुम्हाला घरपट्टी (House Tax) भरावीच लागते. अर्थात तुमचे घर अधिकृत असायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत घरपट्टी हा महसूलाचा एक भाग आहे. घरपट्टी हे स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत (Local Self-Government)  उत्पन्नाचे (Income) प्रमुख साधन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महापालिकेतंर्गत घरपट्टी जमा करावी लागते. सरकारकडून या संस्थांना निधी मिळत असला तरी तो दिवाबत्ती वा इतर संबंधित योजनेवर खर्च करण्यात येतो. ग्रामपंचायतीला स्वयंपूर्णतेसाठी टॅक्स (कर) जमा करणे अत्यावश्यक असते. टॅक्स (Tax) जमा करुन आलेली रक्कम आणि राज्य सरकारकडून प्राप्त निधी यामुळे ग्रामपंचायत, नगरपालिका, परिषद किंवा महापालिका यांचा खर्च भागविण्यात येतो.

कर आकारणी कशी होते?

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम (Mumbai Gram Panchayat Act) 1958 आणि त्यातील कलम 124, महाराष्ट्र कर आणि शुल्क नियम 1960 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीला कर आकारण्याचा अधिकार मिळतो. निवासी आणि औद्योगिक वापरानुसार यामध्ये फरक करण्यात येतो. ग्रामपंचायत हद्दीतील अधिकृत, अनधिकृत बांधकामांना कर लावण्यात येतो. घरपट्टी आकारण्यासाठी संबंधित घर/इमारत ग्रामपंचायतीच्या नमुना 8 मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

बांधकामाच्या प्रकारानुसार दर ठरतो!

बांधकाम केलेल्या क्षेत्रफळाला प्रशासनाने नेमून दिलेल्या वार्षिक दराने गुणले जाते. यात प्रत्येक प्रकारच्या बांधकामाचा प्रकार आणि दर ठरलेला असतो. त्या दरानुसार प्रशासन घरपट्टी आकारत असते. झोपडी, मातीचे बांधकाम, दगड-विटांची इमारत, सिमेट-आरसीसी पद्धतीने केलेले बांधकाम यांच्या मूल्यानुसार टॅक्स आकारला जातो.

कराचा उपयोग कशासाठी?

रहिवाशांकडून कराचा भरणा झाल्यानंतर ग्रामपंचायत या करातून विकास योजनांवर खर्च करते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनही करातून करण्यात येते. दिवाबत्तीचे वीजबिल, गावातील स्वच्छता, गटारी साफ करणे, जंतुनाशक औषध फवारणी केली जाते. किरकोळ रस्ते दुरुस्ती, कार्यालयीन खर्च या करातून करण्यात येतो.

कर नाहीच भरला तर?

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व शुल्क नियम (सुधारणा) 2015 मधील तरतुदीनुसार, ग्रामपंचायतीचा कर भरावा लागतो. थकबाकीवर व्याज लागते. कर भरण्याची नोटीस पाठविण्यात येते. जास्त कर थकला तर कधी कधी ग्रामपंचायत वस्तू जप्तीची कारवाई करु शकते. घरपट्टी, पाणी पट्टी ही गावाच्या विकासासाठी आणि सोयी-सुविधा वाढीसाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. त्यामुळे कर भरण्याला सर्वांनीच प्राथमिकता देणे आवश्यक आहे. अनेकदा कर न भरल्याने महत्वाच्या कामात ग्रामपंचायत दाखले देत नाही अथवा अडवणूक करते.