दिवाळीत अनेक कर्मचाऱ्यांना त्यांची कंपनी बोनस देत असते. खरे तर बोनस म्हणजे अतिरिक्त पगार. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपन्या बोनस देत असतात. वर्षभर कंपनीच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारे कर्मचारी अनेकदा हक्काने कंपनीकडे बोनस मागत असतात. कर्मचाऱ्यांना मिळणार हा बोनस खरे तर एका कायद्याच्या अंतर्गत दिला जातो. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
कुणाला मिळतो बोनस?
बोनस अधिनियम 1965 नुसार, कायद्याने ज्या कंपनीत 20 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे अशा कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस देणे अनिवार्य आहे. कर्मचाऱ्यांशिवाय कंपनीच्या शेयरधारकांना देखील वार्षिक बोनस दिला जातो. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे अशाच कर्मचाऱ्यांना कंपनी बोनस देऊ शकते.
2015 साली अधिनियमात बदल
बोनस अधिनियम अमेंडमेंट 2015 नुसार एक फॉर्म्युला बनवण्यात आला आहे. यानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार 21 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे असे सर्व कर्मचारी बोनससाठी पात्र आहेत.
कर्मचाऱ्याला किती बोनस मिळेल याचा फॉर्म्युला देखील या अधिनियमात सांगण्यात आला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला 10,000 रुपये पगार असेल तर तो कर्मचारी खालील फॉर्म्युल्यानुसार बोनस घेण्यास पात्र आहे.
बोनस (प्रति महिना)= वेतन (प्रति महिना)* 8.33/100
म्हणजेच
बोनस= 10000*8.33/100 म्हणजेच 833 रुपये प्रति महिना
10 हजार रुपये प्रति महिना कर्मचाऱ्यांना पगार असेल तर त्यांना 833 रुपये महिना प्रमाणे एका वर्षाचा 9996 रुपये पगार देण्यात येतो.
स्पॉट बोनस, रेफरल बोनस आणि इतर प्रकार
कंपनी केवळ वार्षिक बोनस देत नाही तर याशिवाय आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवगेळ्या स्वरूपाचा बोनस देखील दिला जातो. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल स्पेशल बोनस दिला जातो. अपेक्षित कामापेक्षा अधिक काम करणाऱ्यांना दिला जाणारा बोनस Spot Bonus म्हणून ओळखला जातो. याशिवाय कंपनीत काम करण्यासाठी हुशार आणि होतकरू कामगारांची, अधिकाऱ्यांची गरज असते.ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी कुणा हुशार आणि गुणवत्तापूर्ण कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला कंपनीत आणले असेल तर त्यांना देखील प्रोत्साहन म्हणून कंपनी बोनस देते, त्याला रेफरल बोनस (Referral Bonus) असे म्हणतात.
Concept Gain नावाचा एक प्रकार देखील कंपन्यांमध्ये असतो. जर एखाद्या कंपनीला दुसऱ्या कुठल्या कंपनीने ओवरटेक केले असेल, खरेदी केले असेल तर अशा परीस्थित कंपनीत कार्यरत असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांना नवी कंपनी बोनस रुपात अर्थसहाय्य करते. जुन्या, अनुभवी कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडू नये आणि आपले योगदान देत राहावे अशी यामागची कल्पना आहे.