मागील 10 वर्षात शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढला आहे. महागाईने उच्च शिक्षणसाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. त्यात परदेशी उच्च शिक्षणासाठी जायचे म्हटले तरी हा खर्च 50 लाखांच्या पुढे जातो. त्यामुळे साहजिकच बँकांकडे शैक्षणिक कर्जासाठी (Education Loan) अर्ज करावा लागतो. मात्र शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया सुलभ आणि सोपी करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. ज्यातून कर्ज मिळणे फार अवघड जाणार नाही.
परदेशी शिक्षण संस्थांच्या तुलनेत भारतातील संस्थांमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज मिळवणे कठिण आहे. बँकांकडून तुमच्या क्रेडीट हिस्ट्रीची काटेकोर तपासणी केली जातेच पण संबधित शिक्षण संस्थेची देखील इत्यंभूत माहिती घेतली जाते. त्यामुळे कर्ज प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे कर्जदारासाठी आव्हानात्मक बनते. शैक्षणिक कर्ज सुरळीत मिळावे यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
नामवंत शिक्षण संस्थेची निवड करा
शैक्षणिक कर्ज घेताना कर्जदाराने नामवंत शिक्षण संस्थेची निवड करणे आवश्यक आहे. लोकप्रिय इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कर्ज घेत असाल तर ते कर्ज मंजुर होण्याची शक्यता वाढते. बँकांना अशा नामवंत संस्थांबाबत विश्वास असतो. त्यामुळे येथून शिक्षण घेणारा विद्यार्थी कर्ज फेड देखील करेल, या उद्देशाने कर्ज मंजूर केले जाऊ शकते. अनेकजण परदेशातील शिक्षण संस्था, युनिव्हर्सिटीज यांची निवड करतात. मात्र यामुळे जोखीम वाढल्याने बँकांकडून कर्ज मिळवणे अवघड बनते. तुम्ही याबाबत बँकांना देखील विचारु शकता. त्यांच्या लिस्टमध्ये कोणत्या संस्थांचा समावेश आहे जिथे अॅडमिशन घेतले तर कर्ज मिळते. हे केल्यास अनावश्यक वेळ वाया जाणार नाही.
कर्जासाठी योग्य वित्तीय संस्था निवडा
शैक्षणिक कर्जामध्ये आता पूर्वीप्रमाणे सरकारी बँकांची किंवा खासगी बँकांची मक्तेदारी राहिलेली नाही. बँकांप्रमाणेच खासगी वित्त संस्था, बिगर बँकिंग वित्त संस्था (NBFC) भारतात आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्ज देतात. त्यामुळे केवळ बँकांच्या भरवशावर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करु नका. कर्जासाठी सर्वच पर्याय खुले ठेवा. जेव्हा तुम्ही कर्ज देणाऱ्या बँका, वित्त संस्था किंवा एनबीएफसी कंपन्या यांच्यात तुलना कराल तेव्हा तुम्हाला यातील अनेक मुद्दे जसे कि व्याजदर, गहाण ठेवण्याबाबतचे नियम लक्षात येतील. बाजारातील स्पर्धा लक्षात घेता जो कमी प्रोसेसमध्ये कर्ज देईल त्या बँकेची किंवा कंपनीची तुम्ही निवड करु शकता.
क्रेडीट स्कोअरबाबत सदैव जागरुक राहा
शैक्षणिक कर्ज असो किंवा गृह कर्ज बँकांकडून कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्जदाराची पत तपासली जाते. त्यामुळे प्रत्येकाने क्रेडीट स्कोअरबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे. क्रेडीट स्कोअर एका विशिष्ट पातळीच्या तुलनेत कमी झाला तर मात्र कर्ज मिळवणे अवघड होऊ शकते. तुमचा क्रेडीट स्कोअरच तुम्हाला किती कर्ज मिळणार आणि किती कालावधीसाठी मिळणार हे ठरवत असतो. त्यामुळे क्रेडीट स्कोअरला धक्का लागता कामा नये, याची दक्षता घ्यायला हवी. क्रेडीट कार्ड्सी बिले, इतर कर्जाचे हप्ते वेळचे वेळी भरणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुमचा क्रेडीट स्कोअर चांगला राहिल.
केवळ कर्जावर अवलंबून राहू नका, इतर पर्याय हाती ठेवा
शैक्षणिक कर्जासाठी बँकेत किंवा वित्त संस्थेत अर्ज केला असला तरी याच एका पर्यायवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. तुम्हाला संबधित इन्स्टिट्युटमध्ये स्कॉलरशीप वैगरे मिळते का याचीही माहिती घ्यायला हवी. त्याशिवाय काही संस्थांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर आणि इतर अॅक्टिव्हीटीजच्या आधारे स्कॉलरशीप दिली जाते. बड्या कॉर्पोरेट संस्था, सरकारी विभाग यांच्याकडून देखील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यातून मिळणारी रक्कम तुमचा कर्जाचा भार कमी करण्यास मदत करु शकते.