Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sharia Law: व्याज न देता, न घेता Islamic Bank नेमकी चालते कशी? जाणून घ्या सविस्तर

Islamic Banking

भारतात, इस्लामिक बँकिंग भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालते. भारत सरकारने अद्याप इस्लामिक बँकिंगसाठी स्वतंत्र नियामक मंडळ मंजूर केलेले नाही, परंतु RBI देशभरातील बँकांना इस्लामिक बँकिंग प्रणालीचा वापर करण्यास अनुमती देते. जगभरात सुरु असलेल्या या बँक नेमके कसे काम करतात हे या लेखात आपण जाणून घेऊयात.

इस्लामिक बँकिंग बद्दल अलीकडच्या काळात बरंच बोललं गेलंय. नावावरूनच तुम्हांला कल्पना आली असेल की ही बँकिंग प्रणाली मुस्लिम समुदायाशी निगडित आहे.इस्लामिक  बँकिंगची एक अशी व्यवस्था आहे जी इस्लामिक कायद्याच्या तत्त्वांचे पालन करते. या कायद्यांना 'शरिया' म्हणूनही ओळखले जाते.

इस्लामिक बँकिंगमधील गुंतवणूक सल्लागार सबिया शेख सांगतात की, इस्लामिक बँकिंगचे प्राथमिक उद्दिष्ट सामाजिक न्याय, नैतिक आचरण आणि इस्लामिक तत्त्वांनुसार आर्थिक विकासाला चालना देत आर्थिक सेवा प्रदान करणे हे आहे. इस्लामिक बँकिंग ही सगळी संकल्पना 'शेअरिंग'च्या संकल्पनेवर आधारित आहे. शरिया कायद्यानुसार नेफखोरी करणं, व्याज वसूल करणं किंवा व्याज देणं सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे या कायद्यानुसार चालणाऱ्या बँका आणि खातेदार  व्यवहारातील जोखीम आणि नफा दोन्ही शेअर करताना दिसतात. शरियाच्या नियमांचे अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले असल्याने काही गुंतवणूकदार मिळालेला नफा बँकेतच ठेवणे पसंत करतात किंवा काही लोक हा नफा गरिबांच्या कल्याणकारी कामांसाठी दान करतात.

सबिया शेख पुढे सांगतात की, इस्लामिक बँकिंगची प्रथा कुराण आणि सुन्नत (प्रेषित मुहम्मद यांनी सांगितलेले नियम आणि कृती) यांवर आधारित आहे.

मुंबईतील एका कंपनीत सीए म्हणून काम करणारे तौसिफ अन्सारी यांच्याशी याबाबत संवाद साधल्यानंतर त्यांनी इस्लामिक बँकिंगबद्दल विस्तृतपणे माहिती दिली.  इस्लामिक बँकिंगच्या मुख्य तत्त्वे सांगताना त्यांनी काही मुद्द्यांचा उल्लेख केला. ही मुद्दे खालीलप्रमाणे:

व्याजाला नकार (Prohibition of Interest): इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज किंवा रिबा (अरेबिक शब्द) घेणे वर्जित आहे. त्याऐवजी, इस्लामिक बँका नफा शेअरिंग करार (आलेला नफा समसमान वाटून घेणे किंवा या नफ्याचे नेमके काय केले जाईल हे आधीच ठरवले जाते). तसेच कर्जासाठी एक करार केला जातो ज्यात ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम कर्जदाराला दिली जाते, केवळ मुद्दल रक्कम घेतली जाते.

नफा आणि तोटा शेअरिंग (Profit and Loss Sharing): इस्लामिक बँकिंगमध्ये, बँक आणि ग्राहक गुंतवणूक किंवा व्यवहारातील जोखीम आणि नफा शेअर करतात. यामुळे खरे तर बँक तग धरून आहेत. या तत्वामुळे इस्लामिक बँकांच्या आर्थिक वाढीला आणि विकासाला चालना मिळण्यास मदत होते.

ट्रेंडिंगला नकार (Prohibition of Trading): इस्लामिक बँकिंग प्रणालीत ट्रेंडिंग करण्यासही मज्जाव आहे. ट्रेंडिंगद्वारे लोक नफाच कमवत असतात असे इस्लामिक बँकिंगमधील जाणकार म्हणतात. परंतु आजच्या काळात अनेक मुस्लिम युवक ट्रेंडिंग करत असून मिळवलेला नफा सामाजिक आणि धार्मिक कार्यांसाठी वापरण्याची पद्धत रूढ झाली आल्याचे सीए अन्सारी सांगतात.

नैतिक आणि सामाजिक जबाबदारी (Ethical and Social Responsibility): इस्लामिक बँकिंग नैतिक आचरण आणि सामाजिक जबाबदारीला विशेष महत्त्व देते. इस्लामिक बँकांना सामाजिकदृष्ट्या उपयोगी पडतील अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले जाते जे समाजाला फायदेशीर ठरतात. बँकेद्वारे ग्रंथालय, अनाथ आश्रम, शैक्षणिक संस्था यांना मदत केली जाते. टर्की, पाकिस्तान, केनिया आदी देशांमध्ये ही बँकिंग प्रणाली आता चांगलीच रुळली आहे. 

अलिकडच्या काही काळात इस्लामिक बँकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि ती आता जगभरातील अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. इस्लामिक फायनान्स इंडस्ट्रीमध्ये $2 ट्रिलियन पेक्षा जास्त किमतीची उलाढाल होत असल्याची माहिती कॉमर्स विषयाच्या प्राध्यापक डॉ. मालन झरदी यांनी दिली. येत्या काही वर्षांत इस्लामिक बँकिंगमधील उलाढाल वाढत जाईल असे डॉ. मालन म्हणतात.

इस्लामिक बँकिंग ही भारतातील तुलनेने नवीन संकल्पना असून अजूनही बऱ्याच मुस्लिम नागरिकांना याबद्दल माहिती नाही असेही डॉ. मालन म्हणतात. शरिया नियमानुसार संपूर्णपणे इस्लामिक बँकिग सुरु करण्यास याआधीच आरबीआयने नकार दिला आहे. परंतु बँकांमध्ये ‘इस्लामिक विंडो’ नावाची एक संकल्पना सुरु करण्यास आरबीआयची परवानगी आहे. 

भारतात, इस्लामिक बँकिंग भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालते. भारत सरकारने अद्याप इस्लामिक बँकिंगसाठी स्वतंत्र नियामक मंडळ मंजूर केलेले नाही, परंतु RBI देशभरातील बँकांना इस्लामिक बँकिंग प्रणालीचा वापर करण्यास अनुमती देते. भारतात, इस्लामिक बँकिंग प्रामुख्याने मुस्लिम समुदायाच्या गरजा पूर्ण करते. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास 14% आहे. मुस्लिम समुदायात होत असलेले मोठमोठे आर्थिक व्यवहार लक्षात घेता इतर बँका देखील इस्लामिक बँकिंग प्रणालीत रस दाखवत आहेत असे डॉ. मालन म्हणतात.

भारतातील इस्लामिक बँकिंग प्रणाली देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही प्रकारच्या बँकांद्वारे ऑफर केली जाते. 2013 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियाने मुस्लिम खातेदारांना आणि गुंतवणूकदारांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच ICICI बँक, अॅक्सिस बँक आणि कुवेत स्थित गल्फ इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Gulf Investment Corporation) या बँकांदेखील भारतात इस्लामिक बँकिंग सुविधा पुरवतात.

खरे तर भारतातील इस्लामिक बँकिंग अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. शरीयाचे नियम पाळून वित्तीय उत्पादने आणि सेवांची मागणी वाढत असताना, भारतातील इस्लामिक बँकिंग अजूनही अनेक आव्हानांना तोंड देत आहे. इस्लामिक बँकिंगसाठी RBI चे स्वतंत्र नियामक मंडळ नसल्यामुळे बँकांना आणि गुंतवणूकदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या बँकिंग प्रणालीबाबद बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही संपूर्ण माहिती नसल्याने प्रत्यक्षात व्यवहार करताना, कायदेशीर बाबींचा विचार करतानाही अनेक अडचणी येत आहेत.