Tax Saving Ideas: ज्येष्ठ नागरिकांना उतारवयातील आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पैसे जपून वापरणे. तसेच जन्मभर मेहनत करून जमा केलेल्या पुंजीवर टॅक्स लागू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. सरकारनेही याबाबत ज्येष्ठ नागरिकांना यातून सवलत मिळावी. यासाठी कायद्यात तरतूद केली आहे. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80TTB अनुसार 50,000 रुपयांपर्यंत कर सवलतीसाठी दावा करता येतो. तर कलम 80TTA अनुसार 60 वर्षांखालील नागरिकांना बचत खाते आणि ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर 10,000 रुपयांपर्यंत कर सवलतीसाठी दावा करता येतो.
इन्कम टॅक्स कायद्यात ज्येष्ठ नागरिकांना टॅक्समधून सवलत मिळण्यासाठी 80C, 80D, 80TTB आणि HRA यासारखी कलमे आहेत. या कलमांचा आधार घेऊन ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिक टॅक्समध्ये सवलत मिळवू शकतात. तर आज आपण कलम 80TTB आणि 80TTA अंतर्गत कशाप्रकारे सवलत मिळते हे पाहणार आहोत.
कलम 80TTB काय आहे?
इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80TTB हे ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवरील व्याजामध्ये जवळपास 50,000 रुपयांची सवलत मिळवून देते. या कलमांतर्गत 60 आणि त्याहून अधिक वय असलेले नागरिक 50,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतात. यातून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्याची संधी प्राप्त होते. या कलमांतर्गत विविध प्रकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याजावरील, जसे की, बॅंकेमध्ये ठेवलेल्या रकमेवर, पोस्ट ऑफिसमधील ठेवींवरील व्याज, तसेच सहकारी संस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवींचा समावेश होतो.
कलम 80TTA काय आहे?
कलम 80TTB प्रमाणेच कलम 80TTA द्वारे 60 वर्षांखालील नागरिकांना कर बचतीचा लाभ घेता येतो. पण हे कलम फक्त वैयक्तिक करदाते किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना बँक, सहकारी बँका किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या गुंतवणुकीवर 10,000 रुपयांपर्यंत व्याज कपात करण्यास परवानगी देते.
कलम 80TTB चा लाभ कसा मिळतो?
कलम 80TTB द्वारे खालीलप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येऊ शकेल. उदाहरणार्थ, एखद्या ज्येष्ठ नागरिकाला बॅंकेतील बचत खात्यावर 5,000 रुपये व्याज मिळते. तर मुदत ठेवीवर (Fixed Deposit) 2 लाखापर्यंत व्याज मिळते आणि इतर स्त्रोतातून अंदाजे 1.50 लाख रुपये मिळतात. तर त्या ज्येष्ठ नागरिकाची एकूण मिळकत 3,55,000 रुपये होते. तर ते कलम 80TTB अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर सवलत घेऊ शकतात.
अशाप्रकारे ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिक इन्कम टॅक्स कायद्यातील 80TTB कलमांतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात. यातून त्यांना 50,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. पण ही सवलत फक्त गुंतवणुकीवरील व्याजावर लागू आहे. तसेच 60 वर्षांखालील नागरिक 80TTA कलमांतर्गत 10,000 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकतात.