अलिकडच्या काळात क्रेडिट कार्ड (Credit Card) ही एक उपयुक्त आणि गरजेची बाब झालीय. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. या क्रेडिट कार्ड्सना एक विशिष्ट मर्यादा असते. या क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेतलं तर त्यावर व्याज लागू नये, असं वाटत असेल तर जेवढं कर्ज घेतलंय ते विशिष्ट कालावधीत पूर्ण करावं. यामुळे तुम्हाला कोणतंही अतिरिक्त शुल्क किंवा व्याज (Interest) द्यावं लागणार नाही. याच कारणामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्यात झपाट्यानं वाढ होत आहे.
Table of contents [Show]
अनेकांना माहीत नाहीत फायदे
ही तर नियमित क्रेडिट कार्डची स्थिती आहे. मात्र याशिवाय एक सुरक्षित क्रेडिट कार्ड हादेखील एक प्रकार आहे. ज्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला नाही, क्रेडिट हिस्ट्री नाही किंवा काही कारणास्तव नियमित क्रेडिट कार्ड मिळवू शकत नाहीत, अशांसाठी सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड हा एक चांगला पर्याय निर्माण झाला आहे. मात्र अनेकांना याबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे रेग्यूलर क्रेडिट कार्ड आणि सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक आहे, सिक्युअर्ड क्रेडिट कार्डाचे फायदे नेमके काय, हे पाहणं गरजेचं आहे.
मुदत ठेवींच्या बदल्यात दिलं जातं कार्ड
कोलॅटरल ठेवींच्या बदल्यात मिळणारं क्रेडिट कार्ड म्हणजे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड होय. मुदत ठेवींच्या बदल्यात ते दिलं जातं. बहुतेक सिक्युअर्ड क्रेडिट कार्डची मर्यादा एफडीच्या 85टक्क्यांपर्यंत ठेवली जाते. जोपर्यंत ग्राहकाची एफडी बँकेकडे आहे, तोवर हे क्रेडिट कार्ड वापरता येवू शकते. मात्र जर क्रेडिट कार्डचं बिल सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड यूझरनं ठरलेल्या कालावधीत कोणत्याही कारणास्तव भरलं नाही, तर बँकेला त्याचं मुदत ठेव खातं एन्कॅश करून कर्ज वसूल करण्याचा अधिकार आहे. ज्यांची क्रेडिट कार्ड रिक्वेस्ट कोणत्याही कारणानं बँकेनं जर नाकारली असेल तर अशांसाठी सुरक्षित क्रेडिट कार्ड हा एक चांगला पर्याय आहे.
बहुतांशी ग्राहकांकडे नियमित क्रेडिट कार्ड्स
सध्या वापरात असलेले किंवा बहुतांशी ग्राहकांकडे असलेली क्रेडिट कार्ड्स ही नियमित असतात, असुरक्षित असतात. असुरक्षित क्रेडिट कार्डसाठी कोणत्याही मुदत ठेवीची गरज नाही. तुमचं इन्कम चांगलं असेल, क्रेडिट स्कोअर उत्तम असेल, री-पेमेंट हिस्ट्री चांगली असेल तर तुम्हाला नियमित क्रेडिट कार्ड सहजरित्या मिळतं. ग्राहकाचं ज्या बँकेत खातं आहे, त्या बँकेकडून बहुतांश पगारदारांना हे कार्ड ऑफर केलं जातं. बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या कार्ड्सवर ग्राहक विविध बक्षिसे आणि कॅशबॅक देखील घेऊ शकतात. बहुतांशी जणांकडे याचप्रकारचं क्रेडिट कार्ड असतं.
सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड आणि फायदे
- वेळेवर बिल पेमेंट करून क्रेडिट स्कोअर सुधारण्याची संधी असते. याच कारणामुळे भविष्यात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
- या क्रेडिट कार्डचे व्याजदर नियमित क्रेडिट कार्डच्या तुलनेत कमी आहेत. मात्र ते एफडीच्या बदल्यात दिलं जातं.
- कोलॅटरल डिपॉझिटच्या मिळत असल्यानं यास मंजुरी मिळणं सोपं असतं. यासाठी ग्राहकाला कोणतंही अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज पडत नाही.
- एफडीवर क्रेडिट कार्ड घेतल्यानं कार्ड होल्डरला फिक्स डिपॉझिट अकाउंटवर व्याज मिळण्यासह कोणत्याही अतिरिक्त शुल्क न भरता आपला क्रेडिट लिमिट वाढवण्याचा पर्याय उपलब्ध होतो.