अॅमेझॉननं 2013मध्ये आपलं ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म भारतात लॉन्च केलं. मागच्या 10 वर्षाच्या कालावधीत कंपनीनं अनेक चढ-उतार पाहिले. मात्र एक आर्थिक ध्येय समोर ठेवून कंपनीनं आपली वाटचाल सुरू ठेवलीय. भारताची बाजारपेठ लक्षात घेता कंपनीनं ज्या योजना आखल्या त्या पूर्ण यशस्वी झाल्याचं मागच्या 10 वर्षांतून दिसून आलंय. आता यापुढेही कंपनी भारतातली गुंतवणूक (Investment) वाढवणार आहे. टीव्ही 9नं हे वृत्त दिलंय. कोविडच्या काळात कंपनीला विशेष फायदा झाला. लॉकडाउनमुळे (Lockdown) कंपनीचं उत्पन्न वाढलं. ऑनलाइन शॉपिंगमध्ये वाढ झाल्यानं कंपनीचा व्यवसायदेखील वाढला.
पायाभूत सुविधा उभारण्यावर भर
कंपनीनं पुरवठा साखळी, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग अशा काही मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 6.5 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 53,500 कोटी गुंतवले आहेत. कंपनीच्या भारताच्या आगमनावेळी एवढी गुंतवणूक नव्हती. 2021मध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी आपलं सीईओ पद सोडलं. त्यांच्यानंतर अँडी जेसी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कंपनीचा पदभार स्वीकारला. जेसी यांनी खर्च कमी करून नफा वाढवण्यावर भर दिला. खरं तर नफ्यापेक्षा कंपनीचा विस्तार करण्यावर बेझोस यांचा सुरुवातीपासूनच अधिक भर होता. त्यात त्यांना यश आलं. दरम्यान, अॅमेझॉन ही एक 25 वर्षांपासूनची लिस्टेड कंपनी आहे.
'भारतात विस्तार करणार'
अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) सीईओ त्याचप्रमाणे ई-कॉमर्स किंग अॅडम सेलिपस्की यांनी एका मुलाखतीत सांगितलं, की कंपनी भारतात व्यवसायाचा विस्तार करत राहणार आहे. देशातल्या व्यवसायाचा वेग वाढवण्यासाठी अॅमेझॉन 2030पर्यंत 12.7 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
ऑनलाइनवर विश्वास नव्हता
अॅमेझॉन भारतात आलं त्यावेळी म्हणजेच 2013 दरम्यानचा काळ ऑनलाइन खरेदीचा नव्हता. लोकांचा ऑनलाइन वस्तू ऑर्डर करण्यावर फारसा विश्वास नसायचा. अशावेळी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं होतं. इंटरनेट कनेक्टिव्हिटीदेखील प्रभावी नव्हती. या परिस्थितीतही कंपनीनं वेगळा विचार केला. नेमकं काय केलं, पाहू...
- नेटवर्क चांगलं नव्हतं मात्र असं असताना अॅपचे विविध व्हर्जन आणले.
- सुरुवातीच्या काळात अॅमेझॉनकडे केवळ एक गोदाम आणि 100 विक्रेते होते. एवढ्या गुंतवणुकीतून आज कंपनीचा पसारा 15 राज्यांमध्ये 43 दशलक्ष घनफूट साठा एवढा झालाय.
- दोन तासांत किराणा घरी पोहोचवण्याची सेवा 2016साली कंपनीनं सुरू केली.
- प्राइम मेंबरशिपचा प्रोग्राम यावर्षी सुरू करण्यात आलाय. त्यामुळे अॅमेझॉनचा व्यवसाय अधिकच वाढणार आहे.
- पेमेंटचा ऑप्शन देण्यासाठी पे बॅलन्स सेवा सुरू केली.
- अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आज एक मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म झालंय. 2016मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी ओटीटी अत्यंत सुरुवातीच्या टप्प्यात होतं.
- अॅमेझॉननं तेलंगाणाच्या हैदराबादेत जगातलं सर्वात मोठं कॅम्पस उघडलं. 2019मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली.
- जेफ बेझोस यांनी भारतात लघु आणि मध्यम व्यवसायाला चालना देण्यासाठी 2020 मध्ये सुमारे 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली.
- कंपनी विविध प्रकारे आपला विस्तार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2025पर्यंत कंपनी 10,000 इलेक्ट्रिक वाहनं आणण्याचा विचार करत आहे.
- अलीकडेच कंपनीनं ग्लो रोड हा रिसेलर प्लॅटफॉर्मही विकत घेतलाय.
- अॅमेझॉन फ्रेश आणि अॅमेझॉन फार्मसी या माध्यमातून भारतात सेवा देण्यात कंपनी प्राधान्य देत आहे. त्यामुळे अॅमेझॉन हा एक भारतीयांसाठी महत्त्वाचा ब्रँड बनलाय.
दुसरीकडे काही अडचणींचा सामनाही कंपनीला करावा लागतोय. जसं की, सरकारी नियमांमुळे कंपनीला क्लाउडटेलसारखे व्यवसाय बंद करावे लागले आहेत. कंपनीचं लक्ष्य आता पुढच्या काही वर्षांत भारतातून 20 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1.6 लाख कोटी रुपये निर्यात करण्याचं ठरवण्यात आलंय.