कर्ज घेतले असेल तर काहींना शांत झोप लागत नाही. Debt affects your life आर्थिक परिस्थिती जर हलाखीची असेल तर चिंता अधिक. याचा परिणाम तुमच्या जीवनावरही होतो. मात्र, जीवनात आणीबाणीची परिस्थिती कधीही उद्भवू शकते. तुम्हाला अचानक पैशांची गरज भासू शकते. जसे की, वैद्यकीय एमर्जन्सी, नियोजन नसताना केलेली खरेदी, व्यवसायातील तोटा, चुकीचे निर्णय यामुळे तुम्हाला पैशाची गरज भागवण्यासाठी कर्ज काढावे लागू शकते. मात्र, योग्य नियोजन करून तुम्ही कर्जाची वेळेत परतफेड करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींवर ध्यान द्या.
कर्जाचा आणि CIBIL स्कोरचा संबंध
कर्जामुळे तुमच्या आर्थिक जीवनावर मोठा परिणाम होतो. वेळेत जर तुम्ही कर्जाचे हप्ते फेडले नाही तर तुमचा सीबील स्कोर कमी होतो. त्यामुळे वेळेवर हप्ते भरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एकजरी हप्ता चुकवला तरी बँक क्रेडिट ब्युरोला तुमची माहिती कळवते. त्यामुळे तुमचा सीबील स्कोर कमी होईल. भविष्यातही तुम्हाला पुन्हा कर्ज मिळण्यास अडचणी येतील. अनेक ठिकाणांवरून जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुमचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे किती ठिकाणांवरून कर्ज घेतले आहे त्याची यादीच करा आणि योग्य नियोजन करुन वेळेत हप्ते भरण्याचा प्रयत्न करा.
उत्पन्न वाढताच जास्त कर्ज चुकवा
जर तुमचे उत्पन्न वाढले तर तुम्ही कर्जाचा हप्ता वाढवून लवकरात लवकर कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. ५ टक्क्यांपर्यंत इएमआय तुम्ही सहज वाढवू शकता. याद्वारे तुम्ही अधिकचे व्याज वाचवू शकता. अधिक आलेल्या पैशांचा वापर आधी कर्ज चुकवण्यासाठी केला तर अधिक योग्य राहील.
EMI पर्यायाचा वापर करा
तुम्ही EMI किंवा बील पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करु शकता. मात्र, जर तुम्ही क्रेडिट कार्ड काळजीपूर्वक वापरले नाही तर अतिरिक्त खर्च करून बसाल. बऱ्याच बँक क्रेडिट कार्डवर ५० दिवस व्याज आकारत नाहीत. मात्र, जर तुम्ही हप्ते चुकवले तर वार्षिक तुम्हाला ३५ टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागेल. क्रेडिट कार्डच्या बिलाला तुम्ही इएमआयमध्ये कन्वर्ट करुन घेऊ शकता.
प्रोफेशनल सल्लागाराची मदत घ्या
जर कर्ज कसे फेडावे याचा जास्त गोंधळ उडत असेल तर प्रोफेशनल आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. त्यांच्याकडून तुम्हाला कर्ज फेडण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळू शकते. आर्थिक चणचणीच्या काळात तुम्हाला याची जास्त मदत होईल. कारण कर्जाचे हप्ते पुन्हा पाडायचे असल्यास तुम्हाला मदत होईल. जर तुमचे कर्ज जास्त असेल तर सल्लागार तुमच्या वतीने कर्जदाराशी बोलणी करुन योग्य तोडगा काढण्यास मदत करेल.
आर्थिक नियोजन करा -
या आधी जर तुम्ही नियोजन न करता कर्ज घेतले असतील आणि त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडले असाल तर योग्य आर्थिक नियोजनच तुम्हाला वाचवू शकेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही बँकेच्या ऑफरला भुलून लगेच कर्ज घेवू नका. गरज असेल तरच कर्ज घ्या तेही येत्या काळात कर्ज चुकवायची किती क्षमता आहे हे तपासा.