ICICI बँकेच्या (ICICI Bank Limites) माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Dipak Kochhar) यांची तब्बल बारा दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. वेणूगोपाळ धूत (Venugopal Dhoot) यांच्या व्हिडिओकॉन कंपनीला चुकीच्या पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणी दोघांना अटक झाली होती. व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा (Videocon Loan Scam) या नावाने हा घोटाळा ओळखला जाऊ लागला आहे. दीपक कोचर यांना मुंबईच्या आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात तर चंदा कोचर यांना महिलांसाठी असलेल्या भायखळा तुरुंगात (Byculla Jail) ठेवण्यात आलं होतं.
आधी पोलीस कोठडी, मग न्यायालयीन कोठडी
चंदा कोचर यांना अटक झाल्यानंतर पहिले सहा दिवस त्या सीबीआय कोठडीत होत्या. या काळात त्यांना एका बंद खोलीत थंड फरशीवरच झोपावं लागत असल्याचं त्यांचे वकील कुशाल मोर यांनीच न्यायालयात म्हटलं होतं.
त्यामुळे मोर यांनी एक याचिका दाखल करून व्हर्टिगो आणि गुडघ्याचं दुखणं असलेल्या चंदा कोचर यांच्यासाठी घरचं अंथरुण, ब्लँकेट, एक खुर्ची आणि जेवण यांची मागणी केली होती. कोर्टाने त्यासाठी परवानगी दिल्यानंतर चंदा कोचर यांना घरून या वस्तू पुरवण्यात आल्या.
पण, सीबीआय कोठडी 29 डिसेंबरला संपली. आणि तिथून कोर्टाच्या आदेशानंतर चंदा कोचर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत भायखळा जेलमध्ये करण्यात आली. इथपासून त्यांचे तुरुंगातले खरे दिवस सुरू झाले. इथं त्यांची घरचं जेवण, अंथरुण यांची सुविधाही बंद झाली. कारण, न्यायालयाने ही मागणी फेटाळली. भायखळा जेलच्या प्रशासनानं कोर्टात युक्तिवाद केला की, ‘तुरुंगात जेवण व झोपण्याच्या योग्य सुविधा आहेत. त्यामुळे बाहेरच्या साधनांना परवानगी देण्यात येऊ नये.’ हा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरला आणि कोचर यांना घरचं जेवण आणि इतर सुविधा बंद झाल्या.
भायखळा तुरुंगातले दिवस
चंदा कोचर यांना खटला सुरू असलेल्या कैद्याचा दर्जा होता. अशा कैद्यांना गुन्ह्याच्या आरोपाचं स्वरुप पाहून एकटं किंवा नेहमीच्या कोठड्यांमधून इतर कैद्यांबरोबर ठेवण्यात येतं. चंदा कोचर यांचा गुन्हा विघातक स्वरुपाचा नसल्यामुळे तिथं त्या नेहमीच्या बराकमध्ये इतर कैद्यांबरोबर राहत होत्या.
चंदा यांना विशेष सुविधा दिल्या जाव्यात की नको याची सुनावणी कोर्टात झाली तेव्हा तुरुंग प्रशासनाकडून कैद्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दलची माहिती दिली होती. त्यानुसार, ‘कैद्यांना दोन वेळचा चहा, नाश्त्यामध्ये शिरा, उपमा, पोहो, दूध व केळं तर जेवणात पोळ्यी, भाजी, आणि फळं दिली जातात,’ असं नमूद करण्यात आलं होतं.
कैद्याच्या वैद्यकीय अहवालानुसार, अंडी, उकडलेल्या भाज्या असा विशेष आहारही दिला जातो, असं तुरुंग प्रशासनाने म्हटलं होतं. चंदा कोचर यांना सध्या नेहमीच्या कैद्यांना दिला जाणारा आहार दिला जात होता. शिवाय कैद्याला महिन्याभरात सहा रुपये इतके पैसे मनी ऑर्डरने घरच्यांकडून मागवता येतात. त्या सुविधेचा लाभही चंदा यांनी घेतला. आणि या सहा हजार रुपयांतून त्या तुरुंगात स्नॅक्स किंवा इतर गोष्टी विकत घेऊन खात होत्या.
मोकळी हवा खाण्यासाठी तसंच फिरता यावं यासाठी प्रत्येक बराकीतल्या कैद्यांना आपापल्या बराकींबाहेर फिरण्याची वेळ ठरवून देण्यात आली होती. त्यानुसार, चंदा कोचर रोज बराकीबाहेरही फिरत होत्या. तुरुंग प्रशासनाने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, भायखळा तुरुंगाची क्षमता 262 कैद्यांची आहे. पण, सध्या तिथे 400 च्या वर कैदी आहेत.
महत्त्वाचं म्हणजे न्यायालयीन कोठडीत असताना चंदा कोचर यांना एकदा त्यांच्या मुलांनाही भेटता आलं.