कोरोना काळात आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होत होती. मात्र, डिसेंबर मधील आकडेवारीमधून नोकरभरतीमध्ये तब्बल ९० टक्के कपात झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यापासून जागतिक स्तरावर मंदीच्या बातम्या येऊ लागल्याने कंपन्यांनी नोकर भरती कमी केली. मागील वर्षी १ लाखांपेक्षाही जास्त अॅक्टिव्ह जॉब ओपनिंग होत्या. मात्र, आता त्यामध्ये कपात झाली आहे.
जागतिक स्तरावर मंदीचे सावट आल्यानंतर भारतातील आयटी कंपन्यांनी कॉस्ट कटिंग करण्यासाठी फक्त महत्त्वाच्या पदांसाठीच नोकर भरती सुरू ठेवली आहे. कमी महत्त्वाच्या पदांवरील भरती थांबवण्यात आली आहे. तसेच अनेक आयटी कंपन्यांनी भविष्यातील मोठ्या प्रकल्पांनाही विराम दिला आहे. यातूनच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या महसुलावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
मागील काही महिन्यांपासून गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. उत्पन्न कमी झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च परवडत नसल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. रशिया युक्रेन युद्ध, महागाईमुळे जागतिक स्तरावर अनिश्चततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. युरोपीयन देश आणि अमेरिकेत मंदीची शक्यता दाट आहे.
भविष्यामध्ये आणखी काही बड्या कंपन्या नोकरभरती कपात करणार असल्याचे बोलले जात आहे. सेल्सफोर्स ही कंपनी कर्मचारी कपात करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. २०२२ मध्ये भारतात, टीसीएस, इन्फोसीस, विप्रो आणि एचसीएल या कंपन्यांनी २ लाखांपेक्षाही जास्त नोकर भरती केली. मात्र, मागील काही महिन्यात नोकरभरती थांबवण्यात आली आहे.