भारतातील प्रत्येक रस्त्यावर आपल्याला हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) कंपनीच्या गाड्या धावताना पाहायला मिळतात. टू व्हीलर वाहनांची निर्मिती करणारी ही कंपनी वर्षानुवर्षे सर्वाधिक वाहनांची विक्री करते. शुक्रवारी कंपनीने मे 2023 मधील वाहनांच्या विक्री संदर्भातील माहिती जाहीर केली. या माहितीनुसार मे महिन्यात कंपनीच्या सेल्समध्ये 7 टक्के वाढ झाली आहे. लवकरच कंपनी पुढील काही महिन्यात नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहे. ज्यामुळे पुढे जाऊन कंपनीचा सेल आणखी वाढू शकतो. या सर्व गोष्टींचा शेअर्सवर काय परिणाम झाला, ते जाणून घेऊयात. तसेच मे महिन्यात कंपनीने किती गाड्या विकल्या ते ही जाणून घेऊयात.
मे 2023 मध्ये वाहनांची विक्री वाढली, मात्र निर्यातीत घट
हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) कंपनीने मागील वर्षी मे 2022 मध्ये 4,86,704 युनिट्सची यशस्वी विक्री केली होती. ज्यामध्ये यावर्षी 7 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ पकडून मे 2023 मध्ये कंपनीने 5,19,474 गाड्यांची विक्री केली आहे. मात्र कंपनीच्या स्कूटर विक्रीमध्ये मात्र घट झालेली पाहायला मिळाली आहे. मे 2022 मध्ये कंपनीने 34,458 स्कूटर्सची विक्री केली होती. तर मे 2023 मध्ये कंपनीने 30,138 स्कूटर्सची विक्री केली आहे.
कंपनीची देशांतर्गत विक्री उत्तम असून आंतराष्ट्रीय स्तरावरील निर्यात मात्र कमी झाली आहे. हिरो मोटोकॉर्प कंपनीने मे 2022 मध्ये 20,238 गाड्यांची विक्री केली होती. ज्याच्या तुलनेत मे 2023 मध्ये कंपनीने 11,165 गाड्यांची विक्री केली आहे.
पुढेही विक्री वाढेल...
लवकरच मान्सूनची सुरुवात होणार आहे. या मान्सूनमध्ये कंपनीकडून नवीन मॉडेल्स लॉन्च होणार आहेत. या दमदार नवीन मॉडेल्समुळे कंपनीच्या विक्रीत वाढ होईल असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही महिन्यात कंपनीने हिरो एचएफ डीलक्सच्या (Hero HF Deluxe) नवीन व्हर्जन लॉन्च केले होते. ज्याला लोकांची सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. कंपनीने या मॉडेल्समध्ये अनेक बदल केल्याने याची विक्री करणे सोपे गेले आहे.
विक्री आकड्यांचा परिणाम शेअर्सवर पाहायला मिळाला
हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) कंपनीने मे 2023 मध्ये सर्वाधिक वाहनांची विक्री केल्याने त्याचा परिणाम शेअर मार्केटवर सुद्धा पाहायला मिळाला. या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्के वाढ झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी एनएससीवर (NSE) 2892.65 रुपयांनी कंपनीचा शेअर बंद झाला.
Source: abplive.com