आरोग्य विमा असला तरीही अनेकदा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागत असे. मात्र, आता देशातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. याबाबत जनरल इन्शुरन्स कॉन्सिलने ( GIC ) घेतला आहे. GIC च्या या निर्णयाचा देशभरातील कोट्यावधी विमाधारकांना होणार आहे.
GIC ने घेतलेला हा कॅशलेस उपचाराचा निर्णय नक्की काय आहे, आरोग्य विमा असलेल्या पॉलिसीधारकांना याच कशाप्रकारे फायदा होईल ? याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.
देशातील सर्व हॉस्पिटलमध्ये मिळणार कॅशलेस उपचाराची सुविधा
GIC ने देशातील सर्व आरोग्य विम्याची सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करून ‘ कॅशलेस एव्हरीव्हेअर ’ ( Cashless Everywhere) उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत आता देशातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा रुग्ण व विमाधारकांना मिळणार आहे.
आतापर्यंत काही ठराविक व विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा मिळत असे. इतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णांना आधी पैसे भरावे लागायचे व त्यानंतर विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी कागदपत्रांची प्रोसेस पूर्ण करावी लागत असे. मात्र, नवीन नियमानुसार विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा विमाधारकांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. याचाच अर्थ विमाधारकांना आता उपचारासाठीआधी पैसे भरण्याची गरज नाही.
कॅशलेस उपचाराची सुविधा कशी मिळेल?
कॅशलेस उपचार सुविधेचा फायदा घ्यायचा असल्यास रुग्णांना 48 तास आधी विमा कंपनीला याबाबत माहिती द्यावी लागेल. जर आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यास 48 तासांच्या आत विमा कंपनीला याची माहिती दिली जावी. 15 पेक्षा जास्त बेड असलेल्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची सुविधा मिळेल. तसेच, कॅशलेस उपचारासाठी विम्यातील नियम व अटींचा देखील विचार केला जाईल.
कॅशलेस उपचार सुविधेचे फायदे काय?
कॅशलेस उपचारासाठी विमाधारकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. अनेकदा रुग्णांना आरोग्य विमा असतानाही केवळ पैसे न भरल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाहीत. मात्र, आता देशातील सर्वच हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना त्वरित उपचार मिळू शकतील. हॉस्पिटल्स देखील रुग्णांना उपचार नाकारू शकणार नाहीत.
याशिवाय, आर्थिक फसवणुकीचे प्रकार देखील यामुळे टाळले जातील. अनेकदा उपचाराच्या नावाखाली खोटे क्लेम केले जातात. याचा फटका विमा कंपन्यांना बसतो. मात्र, कॅशलेस उपचार उपलब्ध झाल्याने रुग्णांसह विमा कंपन्यांना देखील याचा फायदा होणार आहे.