HDFC-HDFC Bank merger: HDFC Bank आणि HDFC Home Loan अशा दोन कंपन्या आहेत. मात्र, लवकरच या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होऊन फक्त एचडीएफसी बँक असे नाव होईल. विलीनीकरणाची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू असून यावर्षी जून-जुलै महिन्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. ज्या ग्राहकांनी एचडीएफसी होम लोनमधून गृहकर्ज घेतले असेल ती सर्व कर्ज एचडीएफसी बँकमध्ये जमा होतील. या विलीनीकरणाचा EMI, कर्ज आणि कर्जाच्या कालावधीवर काय परिणाम होऊ शकतो, ते आपण या लेखात पाहू.
एचडीएफसी बँक ही बँकिंग क्षेत्रात मोडते तर एचडीएफसी होम लोन ही बिगर बँकिंग वित्तीय सेवा क्षेत्रात येते. दोन्हींसाठी सरकारचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे आता दोन्हींच्या विलीनीकरणामुळे कर्जदार चिंतेत पडले आहेत. लाखो ग्राहकांनी एचडीएफसी होम लोनमधून गृहकर्ज घेतले आहे. एकत्रीकरणानंतर व्याजदर वाढणार की कमी होणार? कर्जाचे हप्ते जास्त होतील की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
HDFC-HDFC Bank विलीनीकरणाचा गृहकर्जदारांवर काय परिणाम होईल
एचडीएफसी होम लोन अंतर्गत येणारी सर्व कर्ज एचडीएफसी बँकेमध्ये हस्तांतरित होतील. गृहकर्जाचे व्याजदर ठरवताना बँक आणि बिगर बँकिग वित्तीय संस्थांसाठीचे नियम वेगळे आहेत. बँकेचे गृहकर्जावरील व्याजदर हे अर्थव्यवस्थेतील बाह्य व्याजदरांशी (External Benchmark Lending Rate -EBLR) निगडीत असतात. उदाहरणार्थ, बँकेचे व्याजदर हे आरबीआयचा रेपो रेट, तीन-सहा महिन्यांचे ट्रेजरी बिल्स आणि इतर मार्केट लिंक्ड बेंचमार्कशी जोडलेले असतात. म्हणजेच रेपो रेट वाढला तर व्याजदरही वाढतात. हे बदल बँकेच्या व्याजदरावर तत्काळ दिसून येतात.
रेपो दर कपातीचा फायदा तत्काळ कर्जदारांना फायदा
दुसरीकडे बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपनीचे व्याजदर हे बाजाराशी जोडलेले नसतात. या कंपन्यांचे व्याजदर हे Benchmark Prime Lending Rate (BPLR) शी जोडलेले असतात. मात्र, एचडीएफसी होम लोन कंपनीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होईल तेव्हा सर्व कर्ज बाजारातील दराशी जोडले जातील. मार्केट लिंक्ड व्याजदर हे जास्त पारदर्शक असतात. त्यामुळे व्याजदर कमी झाले तर हप्ताही कमी होऊ शकतो. तत्काळ व्याजदर कपातीचा फायदा कर्जदारांना मिळतो. बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये हा फायदा तत्काळ मिळत नाही.
एचडीएफसी गृहकर्जाच्या नियम आणि अटी बदलतील का?
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी होम लोन विलीनीकरण झाल्यावर गृहकर्जाचे नियम आणि अटींमध्ये काहीही बदल होण्याची शक्यता नाही. नियोजित तारखांना ग्राहकांना हप्ते भरता येतील. बँकेकडून येणाऱ्या नोटिफिकेशनवर ग्राहकांना लक्ष ठेवावे लागेल.
विलीनीकरणानंतर गृहकर्जाचे व्याजदर आणि कालावधीचे काय?
ज्या बँकेकडे चालू आणि बचत खात्यातील ठेवी मोठ्या प्रमाणात असतात त्या बँका कमी व्याजदरात पैसे उभारू शकतात. त्यामुळे विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक ग्राहकांना कमी व्याजदरात गृहकर्ज देऊ शकते. मात्र, हा निर्णय बँक व्यवस्थापनाच्या हातात आहे. जुन्या कर्जदारांना किंवा नव्या ग्राहकांना व्याजदर कपातीचा फायदा देण्याचा निर्णय बँक विलीनीकरणाची प्रक्रिया झाल्यानंतर होऊ शकतो. व्याजदर कपात झाली तर गृहकर्जाचा कालावधीही कमी होऊ शकतो. मात्र, किती व्याजदर खाली येतील, त्यावर हे अवलंबून असेल. व्याजदर कमी होतीलच असे निश्चित सांगता येणार नाही.
विलीनीकरणानंतर नव्याने कर्ज प्रक्रिया करावी लागेल का?
ग्राहकांच्या सोईसाठी दोन्ही संस्थांच्या विलीनीकरणानंतर एचडीएफसी होम लोनच्या ग्राहकांना नव्याने कर्ज प्रक्रिया करावी लागण्याची शक्यता कमी आहे. नव्याने प्रक्रिया न करता ग्राहक इएमआय भरू शकतात, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
गृहकर्जावर आयकर सूट मिळवताना काय बदल होईल?
याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, एचडीएफसी होम लोन ही कंपनी एचडीएफसी बँकेत विलीन होत आहे. त्यामुळे सर्व कर्ज प्रकरणे हस्तांतरित न होता विलीन होतील. अशा परिस्थितीत एचडीएफसी बँकेकडून मुद्दल आणि व्याज भरल्याचे प्रमाणपत्र कर्जदाराला मिळेल, असे एकच प्रमाणपत्र पुरेसे असू शकते, असे जाणकारांचे मत आहे. या प्रमाणपत्राद्वारे कर्जदाराला आयकरातून गृहकर्जावरील कर वजावटीचा लाभ घेता येईल. एचडीएफसी बँक ग्राहकांना केवायसी कागदपत्रे अपडेट करण्यास सांगू शकते. तसेच जे कर्जदार पोस्ट डेटेल चेकद्वारे गृहकर्जाचे हप्ते भरतात, त्यांना National Automated Clearing House प्रक्रियेतील बदलांना सामोरे जावे लागू शकते. तसेच विलीनीकरण झाल्यानंतर चेक एचडीएफसी बँकेच्या नावे द्यावा लागेल.
एचडीएफसी बँकेच्या कर्जदारांवर काय परिणाम होईल?
सद्यस्थितीत एचडीएफसी बँकेच्या वतीने एचडीएफसी संस्था गृहकर्ज वाटप करते. त्यास क्रॉस सेलिंग असेही म्हणतात. या प्रकारचे व्यवहार करताना वस्तू व सेवा कर द्यावा लागतो. मात्र, भविष्यात दोन्ही संस्था एकत्र आल्यास बँकेचा वस्तू व सेवा कर भरावा लागणार नाही. यातून ग्राहकांना द्यावे लागणारे शुल्क कमी होऊ शकते. दोन्ही वेगळ्या कंपन्या एकत्र येण्यामुळे ग्राहकांना येत्या काळात काही बदलांना सामोरे जावे लागेल. मात्र, हे बदल एकदम होणार नसून हळुहळू लागू होतील, असे जाणकारांचे मत आहे.