तुम्ही घरासाठी होम लोन घेतले आहे; आणि तुमचा प्रत्येक महिन्याला बँकेतून ईएमआय कट होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आजपासून एका बँकेने आपल्या MCLR रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे तुमच्या ईएमआयमध्येही वाढ होऊ शकते.
आरबीआयच्या पतधोरण समितीने मागील दोन बैठका वगळता त्यापूर्वी जवळपास रेपो दरामध्ये 2.50 टक्क्यांनी वाढ केली. परिणामी सर्व बँकांचे कर्ज हे 2.50 टक्क्यांनी महागले आहे. आरबीआय अजूनही सावध पवित्रा म्हणून रेपो दर कमी करत नाही. परिणामी वाढलेले अजून अजून तसेच आहे. त्यात एचडीएफसी बँकेने काही मर्यादित कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट्स (MCLR) मध्ये वाढ केली आहे. बँकेने यामध्ये 15 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे आणि ही वाढ आजपासून म्हणजे 7 जुलै, 2023 पासून लागू झाली आहे.
MCLR म्हणजे काय?
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR) हा बॅंकांचा किमान कर्ज दर आहे. या दरापेक्षा कमी दराने बॅंकांना कर्ज देण्याची परवानगी नाही. एमसीएलआर या नवीन प्रणालीमुळे व्यावसायिक बॅंकांसाठी कर्जाचे दर निश्चित करण्याची पद्धत बदलली. आरबीआयने (RBI) 1 एप्रिल, 2016 रोजी MCLR ही प्रणाली लागू केली. बॅंका कर्जावर किती व्याजदर आकारू शकतात, हे निर्धारित करण्यासाठी ही प्रणाली ठरवण्यात आली.
एचडीएफसी बँकेने सर्वसाधारन एमसीएलआर (Overnight MCLR)मध्ये 15 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. यामुळे याचा दर 8.10 वरून 8.25 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे एका महिन्याचा एमसीएलआर 10 बेसिस पॉईंटने वाढवून तो 8.20 वरून 8.30 टक्के केला आहे. तीन महिन्यांच्या एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉईंटने वाढ करून तो 8.50 वरून 8.60 टक्के केला आहे. तर सहा महिन्यांचा कालावधी असलेल्या एमसीएलआरचा रेट 8.85 वरून 8.90 टक्के केला आहे. एका वर्षाच्या कालावधीत बँकेने कोणताच बदल केलेला नाही. त्याचा रेट 9.05 टक्के ठेवला आहे.
एचडीएफसी बँकेने वाढवलेल्या या दरांचा परिणाम फक्त जुन्या पर्सनल लोन आणि कार लोन घेतलेल्यांवर होणार आहे. तसेच ज्यांनी यापूर्वी फ्लोटिंग रेटने कार लोन घेतले आहे. त्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते.