खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स अर्थात MCLR 0.15% ने वाढवला आहे. सोमवार 7 ऑगस्ट 2023 पासून नवीन कर्जदर लागू झाला आहे. कर्जदर वाढल्याने अल्प कालावधीतील बँकेची कर्जे महागली आहेत.
एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार एक दिवसासाठीची एमसीएलआर दर 8.35% इतका झाला आहे. एक महिन्यासाठी तो आता 8.45% इतका आहे. व्याजदर वाढीनंतर तीन महिन्यांसाठीचा एमसीएलआर 8.70% झाला असून सहा महिन्यांसाठीचा कर्जदर 8.95% इतका झाला आहे.
एक वर्षासाठीचा एमसीएलआर दर 9.10% इतका आहे. वैयक्तिक कर्जे एक वर्ष एमसीएलआर दराने दिली जातात. दोन वर्षांसाठीचा एमसीएलआर दर 9.15% आहे. तीन वर्षांसाठी एमसीएलआर दर 9.20% असल्याचे बँकेने म्हटले आहे.
एचडीएफसी या वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्यात आले. 1 जुलै 2023 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली. दोन्ही कंपन्यांचे मिळून एकूण 6.75 लाख कोटींचे लोन बुक आहे. गेल्या वर्षी ते 5.57 लाख कोटींचे लोन बुक होते.
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांच्या विलीनीकरणानंतर एकूण कर्जाच्या पोर्टफोलिओत किरकोळ कर्जाचा वाटा 57% असल्याचे एचडीएफसी बँकेचे सीएफओ श्रीनिवासन वैद्यनाथन यांनी म्हटले होते.
नुकताच बँकेने एप्रिल ते जून या तिमाहीतील आर्थिक आकडेवारी जाहीर केली होती. 30 जून 2023 अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत एचडीएफसी बँकेला 11 हजार 951 कोटींचा नफा झाला होता. यात गतवर्षाच्या तुलनेत 30% वाढ झाली होती.