Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Bank Announced Dividend: एचडीएफसी बँक देणार आजवरचा सर्वाधिक डिव्हीडंड, शेअर होल्डर्सला होणार बंपर फायदा

Dividend Stocks

HDFC Bank Dividend: खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्स होल्डर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने प्रती शेअर 19 रुपये डिव्हीडंड देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एचडीएफसी बँकेचा हा आजवरचा सर्वाधिक डिव्हीडंड आहे.

खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्स होल्डर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने प्रती शेअर 19 रुपये डिव्हीडंड देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एचडीएफसी बँकेचा हा आजवरचा सर्वाधिक डिव्हीडंड आहे. (HDFC Bank announced Rs. 19 Per Share Dividend for Financial Year 2023) 

एचडीएफसी बँकेने मार्चच्या तिमाहीत दमदार कामगिरी केली. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत एचडीएफसी बँकेला 12047 कोटींचा नफा झाला. त्यात 20% वाढ झाली. त्याशिवाय बँकेच्या एकूण उत्पन्नात देखील 31% वाढ झाली असून ते 53851 कोटी इतके वाढल्याचे बँकेने म्हटले आहे.

बँकेला व्याजातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नात 24% वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत बँकेला व्याजातून 23352 कोटींचे उत्पन्न मिळाले. नेट इंटरेस्ट मार्जिन 4.1% आहे. या दमदार कामगिरीने सोमवारी शेअर्सवर सकारात्मक परिणाम होईल अशी शक्यता शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एचडीएफसी बँकेला 44108.7 कोटींचा नफा झाला. वर्ष 2021-22 च्या तुलनेत त्यात 19.3% वाढ झाली. पूर्ण वर्षभरात बँकेला 118057.1 कोटींचे उत्पन्न मिळाले. चौथ्या तिमाहीत बँकेच्या कर्ज वितरणात देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बँकेने चौथ्या तिमाहीत 634578 कोटींचे कर्ज वितरण केले. यात एक लाख कोटींचे गृह कर्ज मंजूर करण्यात आले. त्याशिवाय वैयक्तिक कर्जासाठी 102067 कोटी वितरित करण्यात आले. चौथ्या तिमाहीत बँकेकडील एकूण ठेवींचा आकडा 1883395 कोटींपर्यंत वाढला आहे. त्यात 20.8% वाढ झाली. CASA ठेवींमध्ये 11.3% वाढ झाली असून यातील एकूण रक्कम 562493 कोटींपर्यंत वाढली आहे. 

बँकेच्या संचालक मंडळाने यंदा प्रती शेअर 19 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. शेअर बाजारात दाखल झाल्यापासून एचडीएफसी बँकेसाठी हा आजवरचा सर्वात जास्त डिव्हीडंड आहे. त्याआधी आर्थिक वर्ष 2022 मध्ये बँकेने प्रती शेअर 15.5 रुपयांचा डिव्हीडंड दिला होता. डिव्हीडंडसाठी 16 मे 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.  

‘एनपीए’चे प्रमाण कमी झाले  (Provision For NPA Falls)

चौथ्या तिमाहीत बुडीत कर्जांसाठी बँकेने 2685.4 कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये बुडीत कर्जांसाठी 3312.4 कोटींची तरतूद करण्यात आली होती. बँकेचा ग्रॉस एनपीए 1.12% इतका होता. नेट एनपीए 0.27% इतका आहे.  

एचडीएफसी बँकेच्या शेअरची सरस कामगिरी (HDFC Bank Stock Outperformed against Benchmark)

एचडीएफसी बँकेचा शेअर गुरुवारी 13 एप्रिल 2023 रोजी एनएसईवर 1692.45 रुपयांवर बंद झाला. त्यात 0.5% वाढ झाली होती. इंट्रा डेमध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअरने 1697.05 रुपयांचा मागील महिनाभरातील उच्चांक गाठला होता. निफ्टी बँक आणि निफ्टी 50 या दोन्ही बेंचमार्कच्या तुलनेत एचडीएफसी बँकेच्या शेअरने सरस कामगिरी केली आहे. मागील एक वर्षात एचडीएफसी बँकेचा शेअरने 4% रिटर्न दिला आहे. याच कालावधीत निफ्टी 50 मात्र 1% ने घसरला.