क्रेडिट कार्ड बऱ्याचदा अडचणींच्या वेळी कामी येते. त्यामुळे प्रत्येकाजवळ क्रेडिट कार्ड असतेच. काही जणांजवळ अनेक कार्ड असतात, अशावेळी त्यांचा त्या क्रेडिट कार्डचा वापर कमी होतो. परिणामी ते तसेच पडून राहते. पण, ते तसेच राहिल्याने बंद पडते की आयुष्यभर सुरूच राहते? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. याशिवाय त्याचे काही वाईट परिणाम होतात का? याविषयी आपण आज पाहणार आहोत.
क्रेडिट कार्डचा वापर न केल्यास काय होते?
जेव्हा कार्ड धारक त्यांचे क्रेडिट काळ जास्त काळापर्यंत वापरत नाहीत. तेव्हा ते निष्क्रियतेचे प्रकरण असल्याचे म्हटले जाते. याचबरोबर ते कधी निष्क्रिय करायचे यासाठी कार्ड जारीकर्ता महत्वाची भूमिका बजावतो. म्हणजेच, तुम्ही कार्डचा वापर बंद केल्यास, सहा महिन्याच्या किंवा वर्षभराच्या अवधीनंतर ते निष्क्रिय केले जातात.
तसेच, काही वेळा कार्ड जारीकर्ता निष्क्रियतेसाठी दीर्घ कालावधी देतो. त्यामुळे तुम्ही कार्ड न वापरल्यास, सुरू ठेवायचे की बंद करायचे याचा निर्णय कार्ड जारीकर्त्यावरच असतो. तसेच, त्यांनी काही नियम ठरवलेले असतात. त्यानुसार ते निर्णय घ्यायला मोकळे असतात.
नवीन कार्डांच्या बाबतीत, RBI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर कार्ड धारकाने कार्ड इन्शुरन्सच्या 30 दिवसांच्या आत त्याचे नवीन क्रेडिट कार्ड सक्रिय केले नाही, तर जारीकर्ता OTP द्वारे कार्ड सक्रिय करण्यासाठी विचारणा करेल, त्यांना तुमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तर क्रेडिट कार्ड सक्रिय करण्याची विचारणा केली त्या दिवसापासून सात दिवसांच्या आत बंद केले जाईल.
निष्क्रिय क्रेडिट कार्डचे काय करायचे?
क्रेडिट कार्डचा काहीच वापर नसल्यास, बरेच जण ते बंद करण्याचा विचार करतात. पण, तज्ज्ञ ते सुरू ठेवण्याचा सल्ला देतात. कारण, ते बंद केल्यास त्याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच, तुमचा क्रेडिट स्कोअर घसरू शकतो.
त्यामुळे काही जण ते निष्क्रिय होणे टाळण्यासाठी ठरावीक अंतराने त्यावरुन छोटे-मोठे व्यवहार करतात. त्यामुळे त्याचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित राहायला मदत होते. पण, तुमच्या क्रेडिट कार्डचा काहीच फायदा नसेल किंवा कार्डचे शुल्क खूप जास्त असेल अशावेळी ते बंद करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.