हस्तकलेच्या वस्तूंनी भारताला 32417 कोटींचे परकीय चलन मिळवून दिले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 या वर्षात हस्तकला निर्यातीत 26.2% वाढ झाली. त्याआधीच्या वर्षात हस्तकला निर्यातून सरकारला 25679 कोटींचा महसूल मिळाला होता.गेल्या वर्षी निर्यात वाढवण्यात ई-कॉमर्सचे मोठे योगदान होते.
केंद्र सरकारने हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पातळीवर उपक्रम राबवले होते. आर्थिक वर्ष 2021 आणि 2022 या वर्षात स्थानिक पातळीवर 397 आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 55 मेळावे आयोजित करण्यात आल्याचे केंद्रातले वस्त्रोद्योग राज्य मंत्री दर्शना जारदोश यांनी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या हस्तकलेच्या वस्तूंमध्ये सर्वाधिक लाकडी वस्तू होत्या.लाकडी हस्तकलेच्या वस्तूंमधून 7891 कोटींचा महसूल मिळाला. त्याखालोखाल एंब्रायडरी वस्तूंच्या निर्यातीतून 5674 कोटी आणि धातूच्या वस्तूंमधून 4179 कोटींचा महसूल मिळाला. हाताने कलाकुसर केलेल्या वस्त्रांच्या निर्यातीतून 2995 कोटींचा महसूल मिळाला.
देशाच्या एकूण निर्यातीत हस्तकलेच्या हिस्सा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हस्तकलेच्या निर्यात वृद्धीमागे सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांची महत्वाची भूमिका राहिली. एमएसएमई मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात एमएसएमई अंतर्गत 15.07 उद्यम नोंदणी झाली. हे सर्व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक हातमाग, हस्तकला, कृषीशी निगडीत उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये देशभरातील जवळपास 43 लाख 15 हजार महिलांना रोजगार मिळाला आहे.
जिल्ह्यातील उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने वन डिस्ट्रीक्ट वन प्रोडक्ट ही योजना सुरु केली आहे. हस्तकला, कारखाना उत्पादन आणि कृषी उत्पादनांसाठी ही योजना फायदेशीर आहे. ऑगस्टमध्ये सरकारने या उत्पादनांसाठी ई-मार्केट प्लेस (GeM) सुरु केली होती. यावर 200 हून अधिक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.