Gudi Padwa 2023: गुढी पाडवा म्हणजे हिंदु नवर्षाचा पहिला दिवस. या दिवसाला हिंदू धर्मियांमध्ये फार मोठे स्थान आहे. खासकरून साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त गुढी पाडवा या दिवशी असतो. या दिवशी सोने, घर, गाडी, ऑफिस किंवा कोणतीही नवीन वस्तू विकत घेण्याची परंपरा आहे. या दिवसाचा मुहूर्त साधून अनेक जण खास करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात किंवा नवीन घर बुक करतात. यावेळी महानगरांमध्ये खासकरून लक्झरी घरांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येते. यानिमित्ताने अनेक बिल्डर वेगवेगळ्या ऑफर्स ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत.
काही सणांसोबत काही विशिष्ट परंपरा वर्षानुवर्षे चालत राहतात. त्याचा भाग म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून गुढी पाडव्याला मुंबईत नवीन घरांचे बुकिंग करण्याचा ट्रेण्ड आहे. या ट्रेण्डला ग्राहकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता बिल्डरांकडूनही यासाठी विशेष तयारी केली जाते. यामुळे गुढी पाडव्याला घरामध्ये गुंतवणूक करणे किंवा दीर्घकाळातील गुंतवणूक म्हणून एखादी प्रॉपर्टी तरी विकत घेतली जाते. यावर्षीही हा ट्रेण्ड जोरात असून रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.
रिअल इस्टेट क्षेत्राला गुंतवणूकदारांकडून अपेक्षा
गेल्या 6 महिन्यापासून रिअल इस्टेट सेक्टर तेजीमध्ये येत असल्याचे दिसून येते. दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे अनेकांची आर्थिक गणिते बिघडली होती. ती आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा रिअल इस्टेट क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येते. गेल्या 15 दिवसांपासून विविध रिअल इस्टेट बिल्डर्सच्या जाहिराती पाहिल्या तर त्यांच्याकडूनही यासाठी मोठी तयारी सुरू असल्याचे दिसून येते. त्यांनाही यावर्षी गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
लक्झरी घरांची मागणी वाढली
मुंबई किंवा महानगरांचा विचार केला तर रिअल इस्टेटमधील काही ट्रेण्ड बदलत आहेत. जसे की, मोठ्या घरांबरोबरच लोकांकडून आता लक्झरी घरांनी मागणी वाढ लागली आहे. त्यामध्ये चांगल्या अॅमेनिटीजबरोबर अत्याधुनिक सोयीसुविधा हव्यात. मोठी सोसायटी, तिथे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा अशा घरांना सर्वाधिक मागणी असल्याचे रिअल इस्टेट क्षेत्रामधील तज्ज्ञांचे मत आहे.
बिल्डकरांकडून डिस्काऊंट ऑफर्स
कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी बिल्डर लॉबीसुद्धा सज्ज झाली आहे. बिल्डरांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. काही बिल्डर्स 5 ते 15 टक्क्यांपर्यंत रेटमध्ये सवलत देत आहेत. तर काही बिल्डर्स स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीमध्ये सूट देत आहेत. महानगरातील नामांकित बिल्डर्स हे फर्निश घरांसोबत एसी आणि इतर अॅमेनिटीज देत आहेत.
(डिसक्लेमर: रिअल इस्टेटमध्ये करण्यापूर्वी अधिकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी रिअल इस्टेटमध्ये खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)