व्हॉट्सॲप ही आघाडीची वैयक्तिक मेसेंजर सेवा म्हणून सर्वांना परिचित आहे. संदेशवहन करताना एन्ड टू एन्ड एनक्रिप्शनसह सुरक्षित सेवा व्हॉट्सॲपद्वारे (End to End Encryption WhatsApp) पुरवली जाते, असा WhatsApp कंपनीचा दावा आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात या सेवेचा लाभ घेतात. अलीकडे भारतात व्हॉट्सॲप चॅनेल्सचा वापर व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. जुन्या ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा नवीन ग्राहक मिळविण्यासाठी वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून व्हॉट्सॲप सेवेचा वापर सुरू केला. त्यात आता बॅंकांचीही भर पडली.
बॅंका आजवर एसएमएस सेवेचा (SMS Service for Banking) वापर करून काही पायाभूत स्वरूपाची माहिती ग्राहकांपर्यंत पोचवत आल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांनीच बॅंकांना दिलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला जातो. मात्र आलेले एसएमएस फोनमध्ये सुरक्षित राहतील किंवा त्यांचे खाजगीपण राहील याची खात्री नसते. इतर अनेक ॲप ही ग्राहकाला त्याच्या फोनवरील एसएमएस संदेशांचा ॲक्सेस मागत असतात. तो द्यावा लागतो, अशी सध्याची स्थिती भारतात अनेक ग्राहकांच्या अनुभवाची आहे.
व्हॉट्सॲपच्या एनक्रिप्टेड मेसेंजर सेवेचा लाभ घेत ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी काही आघाडीच्या बॅंकांनी व्हॉट्सॲप बॅंकिंग (WhatsApp Banking) या नावाने काही बॅंकिंग सेवा देणारी चॅनेलही सुरू केली आहेत. सुरुवातीला, बॅंक खात्यातील जमा रकमेची माहिती देणं यासारख्या बेसिक सुविधा देण्यात येत आहेत, असे दिसते. केवळ लेखी संदेशच नाही तर व्हिज्युअल्स, ग्राफिक्स आधी माध्यमातून खूप साऱ्या बाबी व्हॉटसॲपवर शक्य होतात. त्याचा कल्पक वापर यापुढच्या काळात वाढत जाईल, यात शंका नाही.
भारतात व्हॉट्सॲपचा वापर मोठ्या संख्येने केला जातो. त्यासाठी स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप डाऊनलोड करावे लागते. त्यामुळे लोकांच्या हाती असलेल्या या सुविधेचा वापर करून अधिक ग्राहकांपर्यंत सुविधाजनक रितीने पोहोचता येईल, असा विचार या सेवा सुरू करताना झाला असावा. सध्या भारतातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बॅंक ऑफ बडोदा आणि ॲक्सिस बॅंक यासारख्या अग्रगण्य बॅंका व्हॉट्सॲप बॅंकिंगच्या (WhatsApp Banking) सेवा देतात.
ग्राहकांनी अशा सेवांचा वापर करण्यापूर्वी आपली बॅंक अशी सेवा देते का? याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. तसेच ही सेवा सुरू करायची असेल तर ती आपल्या बॅंकेच्या अधिकृत माध्यमातूनच करून घ्यावी. त्यासाठी लागणारा मोबाईल नंबर बॅंकेकडून अधिकृतपणे पुरविण्यात आला असेल तरच तो वापरावा. तसेच या सेवेचे ॲक्टिव्हेशन बॅंकेने अधिकृतपणे सांगितलेल्या पद्धतीनेच करून घ्यावे, ही काळजी बॅंक ग्राहकांनी घेणं आवश्यक आहे.
काही मोठ्या आणि महत्वाच्या बॅंकांनी पुढाकार घेत सुरू केलेला हा व्हॉट्सॲप बॅंकिंगचा ट्रेंड यापुढच्या काळात कसा वाढतो, विस्तारतो हे आपल्याला दिसेलच. आतापर्यंत खाजगी संदेशांसाठीच प्रामुख्याने वापरली जाणारी ही एनक्रिप्टेड मॅसेज सर्व्हिस (Encrypted Message Service) फायनान्शिअल फिल्डसाठी महत्त्वाची ठरेल, असे दिसते.