श्रमिक वर्गाला आर्थिक सुरक्षा आणि सरकारी लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये ई श्रम पोर्टल सुरू करण्यात आले. मुख्यत्वे असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सरकारी योजनांची माहिती मिळावी आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करावी ही या योजनेमागील भूमिका आहे. या योजनेत नागरीकांचा सहभाग वाढावा आणि त्यांना अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी सरकारने E-Shram पोर्टलवर नवीन फीचर्स विकसित केले आहेत. या फीचर्सद्वारे एका ठिकाणीच सर्व सरकारी योजना आणि कामगार विषयक दस्तावेज श्रमिकांना मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊयात काय आहेत ई-श्रम पोर्टलवरील नवे फीचर्स.
केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव (Labour Minister Bhupender Yadav) यांनी ई-श्रम पोर्टलची नवीन वैशिष्ट्ये लॉन्च केली आहेत, तसेच याबाबत माहिती माध्यमांना दिली आहे. नव्या फीचर्सच्या माध्यमातून श्रमिकांना फायदा होईल आणि भारताच्या विकासयात्रेत त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल असे मंत्री यादव यांनी म्हटले आहे. 21 एप्रिल 2023 पर्यंत, पोर्टलवर 28.87 कोटीहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे अशी माहिती देखील केंद्रीय कामगार मंत्र्यांनी दिली.
ई-श्रम पोर्टलवर नव्याने जोडलेल्या वैशिष्ट्यांमुळे पोर्टलची उपयुक्तता वाढेल आणि असंघटित कामगारांची नोंदणी सुलभ होईल असे ते म्हणाले. ई श्रम नोंदणीकृत श्रमिकांना आता या पोर्टलद्वारे रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण शिबीर, विविध पेन्शन योजना, डिजिटल कौशल्ये आणि राज्यांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आता मिळणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान आहे तो या योजनेत नोंदणी करू शकतो.
Launched the more user-friendly version of e-Shram for the ease of our Shram Jeevis. The new version will also have a Data Sharing Portal and a Data Analytics Portal.
— Bhupender Yadav (@byadavbjp) April 24, 2023
The development will further PM Shri @narendramodi ji’s vision of welfare of our nation-builders. pic.twitter.com/bYy91LNPK4
स्थलांतरित मजुरांना होईल फायदा
ई-श्रम पोर्टलवर आता स्थलांतरित मजुरांना त्यांच्या कुटुंबियांचा, सदस्य संख्येचा, कौशल्यांचा तपशील टाकता येणार आहे. याद्वारे मजुरांच्या कुटुंबियांची माहिती सरकारकडे असेल. या माहितीद्वारे स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे सरकारला सोयीस्कर होणार आहे. तसेच कुटुंबातील महिला, त्यांचे वय आणि शिक्षण या माहितीच्या आधारे महिला केंद्रित सरकारी योजनांची माहिती श्रमिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारद्वारे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती देखील मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांची माहिती थेट बांधकाम कामगार कल्याण मंडळाला (The Building and other Construction Workers) देण्याची सुविधा विकसित केली गेली आहे. याद्वारे बांधकाम क्षेत्रातील श्रमिकांना कल्याण मंडळाच्या विविध उपक्रमांचा आणि योजनांचा फायदा घेता येणार आहे.
डेटा शेअरिंग पोर्टलचा शुभारंभ
केंद्रीय मंत्री यादव यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी डेटा शेअरिंग पोर्टल (DSP) विकसित केले गेले आहे अशी माहिती दिली.हे डेटा शेअरिंग पोर्टल (DSP) देखील मंत्री यादव यांच्या हस्ते लाँच केले गेले आहे. याद्वारे कोणत्या श्रमिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे किंवा नाही हे ओळखणे सुलभ होणार आहे.