• 24 Sep, 2023 07:05

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Parboiled Rice Duty: उकडीच्या तांदळावर 20% निर्यात शुल्क लागू; दरवाढ रोखण्यासाठी निर्णय

boiled rice export

Image Source : www.economictimes.indiatimes.com

केंद्र सरकारने काल (शुक्रवारी) उकडीच्या म्हणजेच बॉइल्ड राइसच्या निर्यातीवर 20% शुल्क लागू केले आहे. स्थानिक बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला. अपुऱ्या मान्सूनमुळे तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Parboiled Rice Duty: केंद्र सरकारने उकडीच्या तांदळावर 20% निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपूर्वी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे पडसाद जागतिक बाजारात उमटले होते. मात्र, देशांतर्गत किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. आता उकडीच्या तांदळावर निर्यात शुल्क लागू केल्याने निर्यात कमी होईल.

उकडीचा तांदूळ म्हणजे काय?

भाताचे उत्पादन घेतल्यानंतर धान पाण्यामध्ये उकळण्यात येते. त्यामुळे तांदळातील गुणधर्मात बदल होतो. नंतर हा तांदूळ पुन्हा सुकवला जातो. साध्या  तांदळापेक्षा उकडलेला तांदूळ जास्त आरोग्यदायी असतो. उकळल्यामुळे हा तांदूळ पिवळसर दिसतो. त्यास गोल्डन राइस असेही म्हटले जाते. सर्वसाधारणपणे दक्षिण भारतात उकडीचा तांदूळ आहारामध्ये जास्त असतो.  

कमी उत्पादनाची शक्यता

चालू वर्षी अस्थिर मान्सूनमुळे विविध राज्यात कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून जागतिक बाजारात तांदळाचे दर वाढत आहेत.

भारतातही किरकोळ बाजारात तांदूळ महागला आहे. अपुऱ्या पावसामुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले तर पुरवठा कमी होऊन महागाईचा भडका उडू शकतो, या भीतीने सरकारने निर्यातीवर शुल्क लागू केले, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

वातावरणीय एल-निनो घटकाचा प्रभाव खरीप पिकांवर झाला आहे. त्यामुळे बिगर बासमती तांदळाची निर्यातबंदी नोव्हेंबर अखेरपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निर्यातबंदीमुळे स्थानिक बाजारातील पुरवठा वाढून किंमती नियंत्रणात येतील. खरीप पिकाची लागवड संपल्यानंतरच उत्पादन होऊ शकते याचा अंदाज येऊ शकतो. तोपर्यंत निर्यात बंदी राहण्याची शक्यता आहे.

किरकोळ बाजारात तांदूळ 10 टक्क्यांनी महागला

ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमती सुमारे 10 टक्क्यांनी वाढला आहे. तर घाऊक बाजारात सुमारे 11 टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. दरम्यान, सरकारी गोदामातील तांदुळ खुल्या बाजारात विक्री करण्यास सरकारने सुरुवात केली आहे.