Onion Will Become Expensive: देशात टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर आता आणखी एक खाद्यपदार्थ नागरिकांच्या खिश्यावरचा भार वाढवू शकते. अशा स्थितीत टोमॅटोचे भाव वाढल्याने कांद्याच्या बाबतीत सरकार सतर्क झाले आहे. सरकारने यावर्षी बफर स्टॉक म्हणून 3 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्क्यांनी अधिक आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिली.
Table of contents [Show]
कांद्याची सुरक्षितता ही महत्वाची
यासोबतच कांद्याला दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) सोबत कांद्याच्या रेडिएशनची चाचणी करण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात सरकारने 2.51 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक म्हणून ठेवला होता.
सणासुदीत कांदा महागण्याची शक्यता
कमी पुरवठ्याच्या हंगामात कांद्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होत असते. मग अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilization Fund -PSF) अंतर्गत बफर स्टॉक ठेवला जातो. सणासुदीच्या काळात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने यंदा बफर स्टॉकमध्ये मोठी वाढ केल्याची माहिती सिंग यांनी दिली.
३ लाख टन कांदा खरेदी
यंदा ३ लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली आहे. जेणेकरून कांद्याचा पुरवठा कमी होऊन त्याच्या किमतींचा त्रास नागरिकांना होणार नाही. बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करण्यात आला आहे. हा कांदा नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगामाचा आहे. सध्या खरीप हंगामात कांद्याची पेरणी सुरू असून त्याची आवक ऑक्टोबरमध्ये सुरू होईल.
रब्बी कांद्याचे उत्पादन देशात महत्वाचे
2022-23 या आर्थिक वर्षात सरकारने PSF अंतर्गत रब्बी-2022 पिकातून विक्रमी 2.51 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली होती. सप्टेंबर 2022 आणि जानेवारी 2023 या कालावधीत प्रमुख ठिकाणी त्याचा पुरवठा करण्यात आला. एप्रिल-जून दरम्यान उत्पादित झालेल्या रब्बी कांद्याचा भारतातील कांदा उत्पादनात 65 टक्के वाटा आहे. सरकारी आकडेवारी असे दर्शवते की, 15 जुलै रोजी कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 26.79 रुपये प्रति किलो होती, कमाल 65 रुपये प्रति किलो आणि किमान 10 रुपये प्रति किलो होती.