गेल्याकाही वर्षात भारतात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बेरोजगारीच्या समस्येमुळे सरकार देखील युवकांना उद्योग-धंदे सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. देशाच्या औद्योगिक विकासात MSME क्षेत्राचा मोठा हातभार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी कोणतेही अडथळे येऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून अनेक कर्ज योजना सुरू करण्यात आल्या आहेत.सरकारद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी राबविल्या जाणाऱ्या अशाच काही योजनांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Table of contents [Show]
पंतप्रधान मुद्रा योजना
केंद्र सरकारने वर्ष 2016 मध्ये या योजनेची सुरूवात केली होती. या योजनेंतर्गत विना-कृषि लघु/सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तुमचा व्यवसाय मनोरंजन, डेअरी व पशु, फिटनेस-सौंदर्य, खाद्य, गारमेंट्स, घर सजावट, परिवहन, उत्पादन, दुरुस्ती या प्रकारात मोडत असल्यास तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.
सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बँका, सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँका सारख्या वित्तीय संस्थेकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता. आतापर्यंत या योजनेंतर्गत 40 कोटी लोकांना जवळपास 23 लाख कोटी रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. योजनेंतर्गत कर्जाची शिशु, किशोर आणि तरूण अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये अनुक्रमे 50 हजार रुपयांपर्यंत, 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत आणि 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज प्रदान केले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://www.udyamimitra.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविली जातो. 20 लाख रुपयांपर्यंतचे सेवा क्षेत्रातील व्यवसाय व 50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन क्षेत्रातील उद्योग या अंतर्गत कर्जासाठी पात्र असतील. उद्योगांना 90 टक्क्यांपर्यंत कर्ज प्रदान केले जाते. आठवी पास असलेली 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती नवीन उद्योग सुरू करत असल्यास या योजनेचा फायदा घेऊ शकतात. https://www.kviconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येईल.
क्रेडिट गॅरेंटी फंड्स फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइझेस (CGTMSE)
उद्योगासाठी कर्ज काढताना मालमत्ता तारण ठेवावी लागते. मात्र, या योजनेंतर्गत विनातारण 5 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळते. मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालय व SIDBI द्वारे ही योजना राबविली जाते. खासगी, सार्वजनिक बँकेसह इतर वित्तीय संस्थेकडून उद्योगासाठी कर्ज मिळते. तुम्हाला https://www.cgtmse.in/ अधिकृत वेबसाइटवर या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती मिळेल.
MSME लोन इन 59 मिनट्स
उद्योगासाठी भांडवल उभे करणे सर्वात अवघड गोष्ट असते. कर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यास अनेक महिने लागतात. मात्र, या योजनेंतर्गत अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला 5 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना त्वरित कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी https://www.psbloansin59minutes.com/ ही वेबसाइट Online PSB loans Ltd या कंपनीद्वारे सुरू करण्यात आली आहे. या कंपनीत सिडबी व इतर सार्वजनिक बँकेची भागीदारी आहे. कर्जासाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन आहे. ठराविक कागदपत्रांची माहिती दिल्यास 59 मिनिटात कर्ज मिळते.