Google Celebrates 25th Birthday: गुगलला आपल्या आयुष्यात येऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा दिवस साजरा करायलाच हवा. कारण गुगलमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात जो काही फरक पडला आहे. तो नेमक्या शब्दांमध्ये मांडता येणार नाही. आज आपण काहीही शोधायचं असेल किंवा कोणती माहिती हवी असेल तर गुगलवर सर्च करतो. पण 25 वर्षांपूर्वी हे आजच्यासारखं सोप्पं नव्हतं. त्यामुळे गुगलची 25 वर्षे ही डिजिटली अॅक्टीव्ह असणाऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहेत.
Table of contents [Show]
डिजिटल युगातील परवलीचा शब्द 'Google'
गुगल हा आजच्या डिजिटल युगातील परवलीचा शब्द बनला आहे. कारण गुगलकडे कोणत्या प्रश्नाचे उत्तर नाही, असं होतंच नाही. गुगलकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचबरोबर सुरूवातीला फक्त इंग्रजी भाषेत माहिती देणारं गुगल आज मराठी भाषेसह भारतातील 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
गुगलच्या पहिल्या ऑफिसची सुरूवात गॅरेजपासून
गुगलची अधिकृत स्थापना 25 वर्षांपूर्वी आज झाली होती. 27 सप्टेंबर, 1998 मध्ये ऑफिशिअली त्याची सुरूवात केली होती. सर्जंट ब्रिन आणि लॅरी पेज या पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी भाड्याने घेतलेल्या गॅरेजमधून गुगलच्या पहिल्या ऑफिसची सुरूवात केली होती. आज त्यांच्या त्या सुरूवातीमुळे जगातील प्रत्येक घराघरांत Google पोहोचले आहे.
गुगलमुळे रोजगाराची भाषा बदलली
तंत्रज्ञानामुळे एकूणच रोजगार आणि कामाच्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पण गुगलच्या वाढत्या वापरामुळे नोकऱ्यांचे स्वरूप, जाहिराती, मार्केटिंग स्ट्रॅटेजी यामध्येही मोठा बदल झाला आहे. या बदलामुळे अनेकांची करिअर घडली. अनेकांना करिअरचा नवीन मार्ग सापडला. एकूणच गुगलने या 25 वर्षांत जे बदल घडवून आणले आहेत. त्याचा एक वेगळा परिणाम दिसून येत आहे. गुगलची फक्त तरुणांनाच मदत होतेय, असे नाही. लहानांपासून वृद्धांपर्यंत आता सर्वजण गुगलवर अवलंबून राहू लागले आहेत. गुगलनेही ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आपल्यामध्ये बदल केले आहेत.
गुगलची भारतात 9 भाषांमध्ये मुशाफिरी
गुगल सुरूवातीला झाले तेव्हा ते फक्त इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध होते. पण कालांतराने बदल करत-करत आज जगभरामध्ये गुगल 149 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यातील 9 भाषा भारतातील आहेत. आपल्या मराठी भाषेसह हिंदी, बांग्ला, तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू, पंजाबी आणि गुजराती या भाषांमध्ये सेवा देत आहे.
डिजिटल मिडियाचा तारणहार
गुगलला सध्या डिजिटल मिडियाचा बाप म्हटले जाते. कारण गुगलने ठरवले तरच तुम्ही डिजिटली ग्रो होऊ शकता. डिजिटली मोठ्ठं व्हायचं असेल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असेल, तर गुगलशिवाय पर्याय नाही. यातून गुगल आपल्या ग्राहकांनाही संधी देत आहे; आणि स्वत:ही घेत आहे. कोणतीही वेबसाईट, व्हिडिओ, बातमी, युट्यूब किंवा पुस्तक जरी शोधायचे असेल तर गुगलचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळेच गुगल हा डिजिटल युगातील तारणहार आहे.
डिजिटल मार्केटिंग आणि गुगल
सध्या डिजिटल मार्केटिंगबद्दल खूप बोललं जातं. त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण झाल्या आहेत. या डिजिटल मार्केटिंगचं तंत्र आणि मंत्र जाणून घ्यायचा असेल तर, याचं एकमेव उत्तर आहे, गुगल. गुगल स्वत: ग्राहकांना प्रश्न विचारण्याची संधी देतं आणि त्याच किंवा तशाप्रकारच्या ग्राहकांना त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची संधी देतो. गुगलचे हे तंत्र ज्याला कळलं आहे, तो डिजिटल मार्केटिंगचा नक्कीच बादशाह होऊ शकतो.
मोफत सेवेतून विकसित झालेले बिझनेस मॉडेल
गुगलच्या बिझनेस मॉडेलचा तुम्ही कधी विचार केला आहे का? गुगल कोणतीही प्राथमिक सेवा वापरण्यासाठी आपल्याकडून पैसे घेत नाही. मग ती गुगलवर काही शोधायचे असो किंवा जीमेलचा ईमेल आयडी असो. गुगलच्या ज्या काही किमान सेवासुविधा आहेत. त्यासाठी गुगल काहीच चार्ज स्वीकारत नाही. काही प्रीमिअम सेवांसाठी मात्र गुगल नक्कीच चार्ज करते. पण बहुतांश सर्व सेवा मोफत देऊनही आज गुगल जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे. अनेक देशांमध्ये याची ऑफिसेस आहेत.