Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Antitrust Trial: गुगल, मायक्रोसॉफ्टमधील वाद काय? डिफॉल्ट सर्च इंजिनवरून सत्या नाडेलांचे गंभीर आरोप

Google Antitrust Trial

Image Source : www.twitter.com /www.en.m.wikipedia.org / www.vi.cleanpng.com

स्पर्धा नियमांचे उल्लंघन करून गुगल कंपनीने सर्च इंजिनमध्ये मक्तेदारी निर्माण केल्याचा आरोप मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांनी केला आहे. गुगलवर अमेरिकेतील न्यायालयात खटला सुरू आहे. यावेळी सत्या नाडेला यांनी साक्ष दिली. यावेळी त्यांनी गुगल कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले.

Google Antitrust Trial: टेक जायंट गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये मागील दोन दशकांपासून तीव्र स्पर्धा सुरू आहे. जसे प्रत्येक लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम पाहायला मिळते, तसे प्रत्येक डिव्हाइसवर मग तो मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा पीसी असो गुगल सर्च इंजिन पाहायला मिळते. गुगल सर्च इंजिनच्या बाबतीतच इतकं पावरफुल्ल आहे, की त्याने मायक्रोसॉफ्ट, याहू सारख्या स्पर्धक कंपन्यांना बाजारातून बाहेरचा रस्ता दाखवला. 

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे “बिगं सर्च इंजिन” आणि याहू सर्च इंजिनचा बाजारातील वाटा अगदी नगण्य आहे. गुगल सर्च इंजिन मार्केटमध्ये लिडर आहे. मात्र, ही मक्तेदारी गुगलने बाजारातील  स्पर्धा नियमांचे उल्लंघन करून मिळवल्याचा आरोप होत आहेत.

गुगल विरोधात अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी. सी येथील न्यायालयात अँटिट्रस्ट खटला सुरू आहे. गुगलने स्पर्धा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमवारी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे नागरिक सत्या नाडेला यांची न्यायालयापुढे साक्ष नोंदवली. त्यांनी दिलेल्या जबाबानंतर जगभर चर्चा सुरू झाली आहे. नाडेला यांनी दिलेल्या उत्तरात गुगल कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले. सर्च इंजिनमधील स्पर्धा संपवण्यास गुगल जबाबदार असल्याचंही ते म्हणाले. 

सत्या नाडेला यांनी कोणते आरोप केले? 

गुगलने विविध कंपन्यांचे मोबाइल, लॅपटॉप, पीसी, टॅबलेटमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी कंपन्यांना कोट्यवधी रुपये दिले. 

अॅपल कंपनीच्या सर्व डिव्हाईसेसमध्ये (आयफोन, मॅकबुक, आयपॅड इ.) सर्च इंजिन डिफॉल्ट ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतो.  

गुगलने सर्च इंजिन डिफॉल्ट ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांसोबत करार केले आहेत. या करारांमुळे स्पर्धक कंपन्या बाजारातून नामशेष होऊन गुगलची मक्तेदारी तयार झाली.. ही मक्तेदारी गुगलने जाणीपूर्वक तयार केली. असे करताना स्पर्धा नियमांचे उल्लंघन झाले. 

गुगल सोबत सर्च इंजिन डिफॉल्ट ठेवण्याचा करार करताना अॅपल कंपनीने मायक्रोसॉफ्ट कंपनीचा वापर कराराची किंमत वाढवून घेण्यासाठी केला. थोडक्यात काय तर, गुगलला डावलून मायक्रोसॉफ्टचा बिंग सर्च इंजिन डिफॉल्ट ठेवण्याची भीती दाखवून अॅपलने जास्त रक्कम पदरात पाडून घेतली.  

जर सर्च इंजिन कंपन्यांमध्ये स्पर्धा नसते तर गुगलने कोट्यवधी डॉलर अॅपल कंपनीला दिले असते का? 

गुगलच्या अशा करारातून स्पर्धा नियमांचे उल्लंघन झाले असून आता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही गुगलला जास्त फायदा होईल. त्यामुळे गुगलसमोर इतर स्पर्धक कंपन्या टिकू शकणार नाहीत.

डिफॉल्ट सर्च इंजिन कधीपासून?

सर्वप्रथम 2002 पासून गुगलने अॅपल कंपनीच्या सर्व आयफोन, आयपॅड आणि मॅक बुकसारख्या डिव्हाइसेसमध्ये गुगल सर्च इंजिन डिफॉल्ट दिले. डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी गुगल कंपनी अॅपलला पैसे देत आली आहे. ही रक्कम प्रत्येक वर्षी वाढतच राहिली. इतरही कंपन्यांच्या मोबाइलमध्ये गुगल सर्च इंजिन डिफॉल्ट पाहायला मिळते. त्यामुळे सहाजिक ग्राहक गुगल सर्च इंजिनचा वापर करतात. 

मायक्रोसॉफ्ट बिंगला संधी मिळाली नाही 

मायक्रोसॉफ्ट बिंग किंवा याहू कंपन्यांना अशी संधी मिळाली नाही. मायक्रोसॉफ्टने प्रयत्न करूनही त्यांना डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्याची गुगलमुळे आधीपासून असलेल्या करारामुळे संधी मिळाली नाही, असा आरोप होत आहे. अॅपल मोबाइलच्या सफारी ब्राऊझरमध्ये जर मायक्रोसॉफ्टचे बिंग सर्च इंजिन डिफॉल्ट असते तर आज बिंगची प्रसिद्धीही वाढली असती, असे नाडेला यांनी न्यायालयात सांगितले. 

जगभरात गुगलची उत्पादने वापरणारी कोट्यवधी ग्राहक आहेत. ग्राहकांच्या माहिती आणि इंटरनेट वापराच्या सवयीवरून गुगलने जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले. तसेच इतरही अनेक उत्पादने गुगलला लोकांपर्यंत पोहचवता आली, त्यातून गुगल बलाढ्य होत गेली. गुगलने बाजारपेठ काबीज करण्यामागे सर्च इंजिन कारणीभूत आहे. स्पर्धेचे नियम मोडून गुगल सर्च इंजिनमध्ये पुढे गेल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.