जागतिक बाजारातील मंदीची परिस्थिती, सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात वाढलेला ओघ यामुळे सोने दराने नवा रेकॉर्ड केला आहे. शुक्रवारी 17 मार्च 2023 रोजी भारतातील मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59461 रुपयांवर गेला. कमॉडिटी मार्केटचा आजवरचा सोने दराचा उच्चांकी स्तर आहे. (Gold Price Hits Record High in India)
अमेरिका आणि युरोपातील बँका एकामागोमाग संकटात सापडत आहेत. गेल्या आठवड्यात दोन अमेरिकी बँका आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने बंद कराव्या लागल्या होत्या. त्यापाठोपाठ क्रेडिट स्वीस ही युरोपातील मोठी बँक आर्थिक संकटात सापडली. या घटनांनी जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आर्थिक अनिश्चितता आणि मंदीचा प्रभाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट आणि बाँड मधील पैसे काढण्याचा सपाटा लावला. त्याऐवजी भरवशाची गुंतवणूक म्हणून सोने गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आले. परिणामी आठवडाभरात गोल्ड रेटमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव आठवडाभरात 6.48% वाढला आहे. वर्ल्ड मार्केटमध्ये सोने 1988.50 डॉलर प्रती औंस इतके पोहोचले आहे.
वर्ल्ड मार्केट मधील तेजीचे पडसाद भारतात देखील उमटले. एमसीएक्स वर सोन्याचा भाव 60000 रुपयांच्या समीप पोहोचला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 59461 रुपयांवर गेला. बाजार बंद होताना सोने 59420 रुपयांवर स्थिरावले. त्यात 1414 रुपयांची वाढ झाली. त्यापूर्वी गुरुवारी सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 58847 रुपये इतका होता. सोन्याचा भाव रेकॉर्ड पातळीवर गेला आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारी एमसीएक्स सोने 56130 रुपये इतका होता. आठवडाभरात सोन्याचा भाव 5.86%ने वाढला.
कोरोना टाळेबंदी लागू होताच सोन्यामध्ये तेजी दिसून आली होती. जवळपास सहा महिने सोन्याचा दर सातत्याने वाढत होता. काल त्याचाच प्रत्यय आला. युरोप अमेरिकेतील बँकिंग संकटाने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. काही जाणकारांच्या मते बँका संकटात सापडणे म्हणजे 2008 मधील जागतिक मंदीची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे जगभरात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. विशेषत: मोठे फंड हाऊस, ट्रस्ट आणि संस्थात्मक गुंतवणूकदार इक्विटी आणि बॉंड गुंतवणुकीबाबत सावध झाले आहेत. त्यांनी सुरक्षित आणि भरवशाची गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिली आहे. मागील आठवडाभरात गोल्डमधील गुंतवणुकीचा ओघ प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सोन्यातील तेजीला फायदा झाला. वर्ल्ड मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रती औंस 1988.50 डॉलर प्रती औंस इतका पोहोचला. त्यापूर्वीच्या आठवड्यात सोन्याचा भाव 1867 डॉलर इतका होता.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिशनच्या वेबसाईटनुसार शुक्रवारी सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव 58220 रुपयांवर स्थिरावला. एक किलो चांदीचा भाव 66773 रुपये इतका होता. यात जीएसटीचा समावेश नाही.
गुढी पाडव्यावर महागाईचे सावट
मागील आठवडाभरात सोन्याचा भाव 5% ने वाढला असून तो 60000 रुपयांच्या समीप पोहोचला आहे. दागिना खरेदी करताना त्यावर घडणावळ मजुरी, जीएसटी आणि इतर शुल्क आकारले जाते. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याच्या दागिना खरेदी करताना त्यात किमान 2500 ते 3000 रुपयांची वाढ होते. सध्याचा सोन्याचा भाव 60000 रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. गुढी पाडव्याला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. येत्या 22 मार्च 2023 रोजी गुढी पाडवा आहे. त्यापूर्वीच सोने प्रचंड महागले आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि आर्थिक संकट लक्षात घेता सोन्यातील तेजी आणखी काही दिवस कायम राहील, असे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.फेडरल रिझर्व्हची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले तर सोन्याचा भाव कमी होईल. बँकेने व्याजदर जैसे थेच ठेवले तर सोन्याचा भाव 2100 डॉलर प्रती औंस जाऊ शकतो असा अंदाज इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनचे मुंबई विभागीय अध्यक्ष कांतीलाल शाह यांनी महामनीशी बोलताना व्यक्त केला. शाह म्हणाले की सोन्यातील तेजी मागे जागतिक बाजारातील घडामोडी कारणीभूत आहेत. मात्र पाडव्यापूर्वी एकदा सोन्याचा भाव खाली येईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. गुढी पाडव्यापूर्वीच सोने महागल्याने खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.