Gold Imports Fall: भारताच्या सोने आयतीत घसरण झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत सोन्याची आयात 24 अब्ज डॉलरवर आली असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही 17 टक्के घट असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यामुळे भारताची वित्तीय तूट (Fiscal Deficit) कमी होण्यास मदत होणार आहे.
चांदीच्या आयातीतही जवळपास दुप्पट घसरण!
गेल्या वर्षी याच कालावधीत चांदीची आयात 29 अब्ज डॉलर इतकी होती. त्यातही घट झाली असून ही घट जवळपास दुपटीने कमी झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितेल आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत चांदीची आयात 4.8 अब्ज डॉलर इतकी होती.
डिसेंबरमध्ये भारतातील सोन्याची मागणी आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वर्षापूर्वी भारताचे सोन्याच्या आयातीचे प्रमाण 343.9 टन इतके होते. ते या डिसेंबरमध्ये 250 टनांपर्यंत येण्याची शक्यता आहे, असे World Gold council च्या भारतविषयक कामकाजाचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम यांनी सांगितले. या घसरणीमुळे 2022 मध्ये भारताचा एकूण सोन्याचा वापर सुमारे 750 टनांपर्यंत खाली येऊ शकतो. जो गेल्या वर्षी 797.3 टन इतका होता. म्हणजे तो 6 टक्क्यांनी कमी आहे, असेही सोमसुंदरम यांनी स्पष्ट केले.
हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीत वाढ!
आयात कमी झाली असताना निर्यातीत मात्र किरकोळ वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीत 1.81 टक्क्याने वाढून 24 अब्ज डॉलर इतकी झाली. यामुळे व्यापारी तूट (Trade Deficit) घटण्यास मदत झाली आहे.
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने सोन्याचा वापर एक वर्षापूर्वीच्या तुलनेत एक चतुर्थांशने कमी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज वर्तवताना काऊन्सिलने महागाईचे कारण सांगितले आहे. महागाईमुळे ग्रामीण भागातून येणारी मागणी कमी होत आहे, असा निष्कर्ष काऊन्सिलच्या अहवालातून मांडण्यात आला आहे. भारतातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी साधारणपणे दोन तृतीयांश मागणी ही ग्रामीण भागातून येते.
जानेवारी 2023 पासून मागणी वाढेल!
जानेवारी 2023 मध्ये सोन्याची मागणी वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोन्याच्या आयातीची मागणी घटल्याने भारताची वित्तीय तूट कमी होण्याबरोबरच रुपयाला आधार मिळण्यासही मदत होऊ शकते.