Go First Airlines: आर्थिक अडचणीमुळे गो फर्स्ट एअरलाइन्सची सेवा 3 मे पासून बंद आहे. दरम्यान, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (DGCA) गो फर्स्टला विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. सेवा सुरू करण्यासाठी गो फर्स्टने सरकारकडे अर्ज केला होता. तसेच गुंतवणूकदारांचाही शोध सुरू केला आहे.
नियम अटींची पूर्तता करावी लागेल
दिल्ली उच्च न्यायालय आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलपुढे गो फर्स्टच्या दिवाळखोरीची याचिका अद्यापही प्रलंबित आहे. विमान सेवा सुरू करण्यासाठीच्या सर्व अटी आणि नियमांची पूर्तता केल्यानंतर कंपनीला सेवा पूर्ववत करता येईल. जर कंपनीने आपल्या नियोजनात कोणताही बदल केला तर याची माहिती तत्काळ DGCA ला द्यावी लागेल. त्याशिवाय कंपनीला सेवा सुरू करता येणार नाही, असे DGCA ने म्हटले आहे.
सखोल ऑडिट होणार
23 जुलैपर्यंत कंपनीच्या सर्व फ्लाइट्स रद्द असल्याचे गो फर्स्टने ट्विटरवरून जाहीर केले आहे. कामकाजात अडचणी असल्यामुळे सेवा बंद असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गो फर्स्टची सेवा सुरू होण्याआधी DGCA द्वारे कंपनीचे सखोल ऑडिट होणार आहे. मुंबई आणि दिल्ली येथील विमानांचीही पाहणी होणार आहे. यामध्ये सर्व काही ठीक असल्यास 22 फ्लाइट्स सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.
कंपनीची विमाने उड्डाणासाठी सक्षम आहे की नाही हे तपासण्यात येणार आहे. प्रशिक्षित पायलट, केबिन क्रू, देखभालीसाठी कर्मचारी कार्यरत आहेत का हे पाहण्यात येईल. कंपनी बंद पडल्यानंतर पायलटसह इतर कर्मचाऱ्यांनी दुसरी नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. काही कर्मचाऱ्यांना कंपनीने थोपवून धरले होते.
संभाव्य खरेदीदारांचाही शोध सुरू
गो फर्स्ट एअरलाइन्स खरेदी करण्यासाठी Expressions of Interest (EoIs) जारी करण्यात आले आहे. इच्छुक खरेदीदारांची यादी 9 ऑगस्टपर्यंत जमा करायची आहे. गो फर्स्ट एअरलाइन्समध्ये 4 हजार 200 कर्मचारी आहेत. मार्च 2022 आर्थिक वर्षातील कंपनीचा महसूल 4,183 कोटी रुपये आहे. तर कंपनीवरील कर्जाचा बोजा 11,463 कोटी रुपये आहे.
गो फर्स्टने विमानाच्या इंजिन खरेदीची ऑर्डर एका अमेरिकन कंपनीला दिली होती. मात्र, वेळेत इंजिनचा पुरवठा न झाल्याने कंपनी अडचणीत आली. त्यामुळे नॅशनल लॉ ट्रिब्युनलपुढे कंपनीने दिवाळखोरीची याचिका स्वत:हून दाखल केली होती.