जगभरात मंदीचे पडसाद दिसू लागले आहेत. युरोप आणि अमेरिका खंडातील देशांमध्ये मंदीची झळ बसू लागली आहे. भारतावर अद्याप मंदीचा जास्त परिणाम झाला नाही. मात्र, महागाई नियंत्रणात नसल्याने नुकतेच रिझर्व्ह बँकेने व्याजदार वाढवले आहेत. आता जगभरातील शिखर बँका व्याजदर वाढीच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. महागाई वाढत असल्याने २०२३ मध्ये गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे शिखर बँका आताच सावध झाल्या आहेत.
यातील अनेक बँकांनी अर्धा टक्क्यांनी व्याजदर आधीच वाढवले आहेत. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, युरोपीयन सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लड यांनी पुढील वर्षी आणखी दरवाढ करण्याचे सुतोवाच दिले आहेत. अर्थव्यवस्था कमकुवत होत असली तरी दर वाढवण्याशिवाय बँकाकडे पर्याय उपलब्ध नाही. पतधोरण आणखी कठोर केल्याने बाजारातील मागणी पुरवठ्यावर परिणाम होईल. रोजगाराच्या संधीही कमी होतील. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था डबघाईला आल्या होत्या, तशी परिस्थिती पुढील वर्षी येण्याची चिन्हे आहेत.
1980 नंतरचा सर्वात जास्त महागाई दर
जगभरामध्ये 1980 नंतर पहिल्यांदाच महागाई वेगाने वाढत आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी शिखर बँका दरवाढ करत आहेत. मात्र, बँकांच्या या पवित्र्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. किरकोळ क्षेत्रातील महागाई वाढली आहे. अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली असून प्रकल्प पुढे ढकलले आहेत. आयटी क्षेत्रामध्येही मंदी आली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युरोपला होणार इंधन पुरवठा कमी झाला. त्यामुळे जगभरातील इंधनाच्या किंमती वाढल्या. उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढवा. पाइपलाइद्वारे युरोपला रशियातून नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो, त्यात अडथळे आले. संपूर्ण युरोप रशियावर नैसर्गिक वायूसाठी अवलंबून आहे. पर्यायी इंधन स्वस्तात उपलब्ध नसल्याने अनेक देशांनी चढ्या किमतीत इंधनाची गरज भागवली. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. इंधनाच्या किंमत वाढीचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच होत असतो. पुढील वर्षी जागतिक स्तरावर मंदी येणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
भारतातही रिझर्व्ह बँकेकडून दरवाढ
रिझर्व्ह बॅंक इंडियाने वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी 7 डिसेंबरला पुन्हा एकदा रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आरबीआयचा रेपो दर (Repo Rate) 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे लगेचच देशातील सार्वजनिक आणि खाजगी बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. दरवाढ केल्याने बाजारातील मागणी कमी होऊन महागाईला चाप बसेल, असा मानस रिझर्व्ह बँकेचा आहे.