Stock Market Live: जगभरातील शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. कोरियाच्या कोस्पी इंडेक्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. हॉंगकॉंगचा हेंगसेंग निर्देशांकसुद्धा लाल रंगात ट्रेडिंग करत आहे. यापूर्वी अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये डो आणि नॅसडॅक (DOW & NASDAQ) मध्ये 1.7 टक्क्यांची घसरण होऊन ते बंद झाले आहेत. यामागे अमेरिकेच्या फेड रिझर्व्ह बॅंकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात वाढ करण्याचे दिलेले संकेत आहेत. यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये सुद्धा आज त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या केंद्रीय फेडरल रिझर्व्ह बॅंकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल (Jerome Powell, US Federal Reserve Chairman) यांनी मंगळवारी (दि. 7 मार्च) अमेरिकेच्या संसदेमध्ये व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले की, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी फेडरल व्याजदरात वाढ करू शकते, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
भारतीय मार्केटमध्ये डाऊन ट्रेण्डची शक्यता
जागतिक शेअर मार्केटमध्ये होत असलेल्या घसरणीमुळे बुधवारी (दि. 8 मार्च) भारतीय शेअर मार्केटची सुरूवात संथ गतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचा वार्षिक बॉण्ड (US2-Year Bond) हा 2007 नंतर प्रथमच 5 टक्क्यांवर पोहोचला आहे. डॉलर इंडेक्स सुद्धा 105 अंकावर पोहोचला आहे. कमोडिटी मार्केटमध्येही घसरणीचा कल दिसून येत आहे. तर तिकडे सोने-चांदीच्या दरातही अर्ध्या टक्क्यांची घसरण दिसून येते.
दोन दिवसांच्या तेजीला लागणार ब्रेक
भारतीय शेअर मार्केट सोमवारी (दि.6 मार्च) तेजीमध्ये बंद झाला होता. सेन्सेक्स 415 अंकांनी वाढून 60,224 तर निफ्टी 117 अंकांनी वाढून 17,711 अंकांवर बंद झाला होता. त्यावेळी मार्केटमध्ये आयटी, ऑटो आणि ऑईल आणि गॅस सेक्टरमधील कंपन्या तेजीत होत्या. मार्केटमधील या सकारात्मक वातावरणामुळे लिस्टेड कंपन्यांच्या एकूण भांडवलामध्ये 265.54 लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती.
गेलच्या (GAIL) संचालक मंडळाची बैठक 13 मार्चला होणार असून या बैठकीत अंतरिम लाभांश देण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे Gail कंपनीचे शेअर्स आज तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे.
अदानी समुहातील (Adani Group) कंपन्यांचे शेअर्सवर आज जोरदार खरेदी होऊ शकते. अदानी ग्रुपने जवळपास 7374 कोटी रुपयांचे कर्ज वेळेच्या आधी फेडले आहे. अदानी ग्रुपसाठी एप्रिल 2025 हा प्री-पेज कर्ज फेडण्याचा कालावधी होता. तरी कंपनीने त्यापूर्वीच त्यातील बरेचसे कर्ज फेडले आहे. यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरील बॅंकांचा समावेश आहे.