देशभरात आयफोनची निर्मिती करणाऱ्या अॅपल कंपनीचा मोठा वाटा आहे. गेल्या काही महिन्यात भारतात निर्मित होणाऱ्या स्मार्टफोनची निर्यात दुपटीने वाढली आहे. सध्या जगभरात भारत मोबाईल निर्यातीत आघाडीवर आहे. इंडस्ट्री बॉडी इंडिया सेल्युलर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने प्रसिद्ध केलेल्या नवीन आकडेवारीनुसार 2021-22 मधील भारतातून आयफोनची निर्यात 45,000 कोटींवरून वाढून 2022-23 मध्ये दुप्पट 90,000 कोटी इतकी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
10 अब्ज डॉलर किमतीचे मोबाईल फोन निर्यातीचे ध्येय
देशभरातून होत असलेल्या मोबाईल निर्यातीचे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहेत. भारतातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्यात 58% वाढून 1,85,000 कोटी रुपये इतकी झाली आहे. 2023 मध्ये मोबाईल निर्यात 10 अब्ज डॉलर इतकी होईल, असे सरकारचे ध्येय आहे. तसेच, देशात आयफोन निर्मितीला देखील चालना मिळाली असून आजपर्यंत 45 हजार कोटी रुपयांच्या किमतीचे आयफोन देशात तयार झाले असून त्यांची जगभरात निर्यात झाली आहे. गेल्या वर्षभरात निर्यात झालेल्या फोनपैकी आयफोनचा वाटा 50% आहे.
देशातील बाजारपेठेत रोजगार निर्मिती
देशातील आयफोन निर्यातीत अॅपल व सॅमसंग या कंपन्यांचा बहुतांश वाटा आहे. यात एकूण संख्येपैकी इतर कंपन्यांचे फक्त 10 टक्के फोन निर्यात होत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. मोबाईल कंपन्यांनी निर्मितीची क्षमता वाढवल्यामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे देशात इलेक्ट्रॉनिक उद्योगाला प्रोत्साहन मिळाले. देशभरातील मोबाईल फोन निर्यातीतील वाढ प्रामुख्याने अॅपलमुळे बघायला मिळाली आहे. फॉक्सकॉन व विस्ट्रॉन या प्रकल्पांमध्ये आयफोनची निर्मिती होत असून 60,000 कामगारांना येथे रोजगार मिळाला आहे.
PLI योजनेला यश
परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) या योजनेला या यशाचे श्रेय दिले जाते. यामुळे स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्याना उत्पादनाची गुणवत्ता व कामगिरी वाढवण्यात यश येत आहे. यातून मोबाईल निर्मितीची संख्या 2025-26 पर्यंत 50 अब्ज डॉलरहून अधिक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.