जगभरात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संपूर्ण जग डिजिटल झाले आहे. मात्र, या डिजिटल माहितीवर अनेक हॅकर्सचे गट डोळा ठेवून आहेत. अनेक देशांकडून अधिकृतरित्या हॅकिंगचा वापर करून दुसऱ्या देशावर कुरघोडी करण्यात येत असल्याचेही समोर येत आहे. जगभरात सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात 2021 च्या तुलनेत 38% वाढ झाल्याचे चेक पॉइंट रिसर्च या संस्थेने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. बँका, आर्थिक संस्था, सरकारी संकेतस्थळे, आरोग्य यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना हल्लेखोर टार्गेट करत असून माहितीच्या सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे.
भारतामध्ये आरोग्य क्षेत्र हॅकर्सच्या निशाण्यावर
2022 वर्षात जगभरात तसेच भारतामध्येही आरोग्य क्षेत्र हॅकर्सच्या निशाण्यावर होते. या क्षेत्रातील सरकारी, खासगी संस्थांमधील माहिती चोरण्याचा हॅकर्सकडून सर्वात जास्त प्रयत्न झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या हल्ल्यांमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहवालातून समोर आलेल्या ठराविक बाबी -
1)मागील वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत एक संस्थेवर एका आठवड्यात सरासरी 1 हजार 168 सायबर हल्ले झाले.
2) आरोग्य, शिक्षण आणि सरकारी खात्यांवर सर्वात जास्त सायबर हल्ले
3) आफ्रिका खंडातील देशांमध्ये दर आठवड्याला एकाच संस्थेवर सरासरी 1 हजार 875 सायबर हल्ले झाले. तर आशिया पॅसिफिक खंडातील देशांमध्ये एका संस्थेवर एका आठवड्यात सरासरी सतराशे सायबर हल्ले झाले.
4)ब्रिटनमध्ये 2021 च्या तुलनेत सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात 77% वाढ झाली तर अमेरिकेमध्ये 57% सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली.
छोटे मात्र अतिशय हुशार गुन्हेगारांचे गट सायबर हल्ले करण्यात जगभरामध्ये गुंतलेला आहे. दिवसेंदिवस त्यांच्या कारवायांमध्ये वाढ होत आहे. कॉर्पोरेट कंपन्या अंतर्गत संभाषणासाठी वापरत असलेल्या मायक्रोसॉफ्ट टीम्स, स्लॅक, वनड्राइव्ह सारख्या अॅप्लिकेशन हॅक करण्यासाठी सायबर हल्लेखोर प्रयत्न करत आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या माहितीलाही धोका निर्माण झाल्याने टू फॅक्टर अथाँटिकेशनसारखे सुरक्षा कवच कंपन्या वापरत आहेत.
ज्या संस्थामध्ये कमी मनुष्यबळ आहे, अशा संस्थांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. कारण, त्यांच्या सुरक्षेतील त्रुटींचा हल्लेखोर फायदा घेतात. तसेच काही संस्थांकडे निधीची कमतरता असल्यामुळे सायबर सुरक्षेसाठी जास्त काळजी घेतली जात नाही, अशी रुग्णालये, शैक्षणिक संस्थांना हल्लेखोर आपले लक्ष्य बनवत आहेत.