एवढ्यात गृह कर्ज घेण्याचा तुमचा विचार असेल आणि तुम्ही कुठल्या बँकेत याबाबत विचारणा करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोनचा नक्की विचार करा. याचे कारण म्हणजे तुम्ही 31 ऑगस्ट 2023 पर्यंत जर SBI मधून होम लोन घेत असाल तर तुम्हांला प्रोसेसिंग शुल्कात मोठी सवलत मिळू शकते.
होय, अगदी खरं वाचलं तुम्ही. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होम लोन घेतल्यास ग्राहकांना 55 बेस पॉइंट्सपर्यंत सूट दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.
मिळेल 50% पर्यंत सूट
स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना प्रक्रिया शुल्कावर 50% पर्यंत सूट दिली जाणार आहे. होम लोनवर ग्राहकांना किमान 2000 रुपये आणि कमाल 5000 रुपयांची जीएसटी माफी देखील करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर रेडी-टू-मूव्ह-इन घरासाठी जर तुम्ही होम लोन घेत असाल तर प्रोसेसिंग फीवर तुम्हांला 100% सवलत दिली जाणार आहे. आहे की नाही फायद्याची ऑफर? तेव्हा जर तुम्ही होम लोनच्या बाबतीत लवकर निर्णय घेणार असाल तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या ऑफरचा विचार करायला विसरू नका.
सिबिल स्कोअरनुसार मिळेल सूट
बँकेने जाहीर केलेल्या निवेदनानुसार तुमचा सिबिल स्कोअर 750-800 किंवा त्याहून अधिक असल्यास तुम्हांला होम लोनच्या एकूण रकमेच्या 9.15% रक्कम ही प्रोसेसिंग फी म्हणून द्यावी लागते. या स्पेशल ऑफरमध्ये ग्राहकांना 45 बेस पॉइंट्सची सवलत दिली जाईल.
तसेच ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर 700 -749 दरम्यान असेल त्यांच्याकडून 9.35% रक्कम ही प्रोसेसिंग फी म्हणून आकारली जाते. या योजनेत ग्राहकांना 55 बेस पॉइंट्सची सवलत दिली जाणार आहे.
याशिवाय ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर 650 - 699 दरम्यान असेल तर तुम्हांला या योजनेत कुठलीही सवलत मिळणार नाही हे लक्षात असू द्या. 700 च्या आत ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोअर असेल अशा ग्राहकांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
प्रक्रिया शुल्क म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही होम लोन घेता, तव्हा तुमच्या मालमत्तेविषयी बँकेला माहिती घ्यावी लागते. ज्या मालमत्तेसाठी तुम्ही लोन घेणार आहात, ती वैध आहे की नाही? त्यात काही कायदेशीर गैरव्यवहार तर नाही? बांधकाम व्यवस्थित आणि कायद्याला धरून आहे की नाही? या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात बँक तपासून घेते. यासाठी लागणारा खर्च बँक ग्राहकाकडून आकारत असते. प्रत्येक बँकेची प्रोसेसिंग फी ही बँकेनुसार वेगवेगळी असते हे लक्षात असू द्या .