EDLI Insurance Scheme: कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स (EDLI) ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओ द्वारे प्रायव्हेट सेक्टरमधील पगारदार व्यक्तींसाठी राबवली जाणारी इन्शुरन्स पॉलिसी स्कीम आहे. या स्कीमचा लाभार्थी असलेल्या कर्मचाऱ्याचा नोकरी करत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना (Nominee) 7 लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्सचा लाभ मिळतो. हा इन्शुरन्सचा लाभ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employment Provident Fund) आणि कर्मचारी पेन्शन योजना (Employees' Pension Scheme) यामधून मिळतो.
कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स योजनेचा लाभ हा संबंधित कर्मचाऱ्याचा शेवटच्या पगारावर निश्चित केला जातो. कर्मचाऱ्याने ज्या व्यक्तीचे नाव ईडीएलआय योजनेत अधिकृतरीत्या नॉमिनी म्हणून दिलेले असते. त्या व्यक्तीला ही रक्कम मिळते. ईडीएलआय योजनेत नॉमिनी म्हणून नाव नोंदवलेली व्यक्ती हीच भविष्य निर्वाह निधी योजनेत नॉमिनी असते.
कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स या योजनेत कर्मचाऱ्याचा नोकरी करत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला इन्शुरन्सचा लाभ मिळतो. या इन्शुरन्सचा लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही प्रीमिअम भरावा लागत नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारातून जी रक्कम पीएफ साठी कापली जाते. त्यातूनच कर्मचाऱ्याला EDLI योजनेचा लाभ मिळतो. फक्त संबधित कर्मचाऱ्याने याबाबतची माहिती कुटुंबियांना किंवा नॉमिनी असलेल्या व्यक्तीला देणे आवश्यक आहे. कारण सरकारी पातळीवरील अशा अनेक योजना आहेत. ज्याचा अत्यंत कमी प्रीमिअममध्ये कर्मचाऱ्यांना लाभ घेता येतो. पण बऱ्याचवेळा कर्मचाऱ्यांना अशा गोष्टींची माहिती नसल्यामुळे किंवा त्यांच्या कुटुंबियांना अशा योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांना असा लाभांपासून वंचित राहावे लागते.
कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्सुरन्स कोणाला लागू होतो?
ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ म्हणजे प्रोव्हिडेंट फंडसाठी विशेष रक्कम कापली जाते. तसेच ज्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत 12 महिन्यांपेक्षा जास्त वेळ काम केले आहे. दुसरे म्हणजे त्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार 15 हजारांपर्यंत असायला हवा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याचे ईपीएफ खाते असायला हवे. या अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना किंवा नॉमिनीला 7 लाखांचा इन्शुरन्स मिळू शकतो.
EDLI योजनेचा लाभ कसा घेता येतो?
एखाद्या कर्मचाऱ्याचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याचे वारसदाराला किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील नॉमिनी ईडीएलआयसाठी दावा करू शकतात. संबंधित कर्मचाऱ्याने नॉमिनी म्हणून कोणाचीच नोंदणी केली नसेल तर त्या कर्मचाऱ्याची पत्नी किंवा मुलांना या इन्शुरन्सच्या रकमेचा लाभ मिळू शकतो. यासाठी ईपीएफओच्या ऑफिसला फॉर्म 5 IF भरून देणे आवश्यक आहे.