General Motors Layoff: अमेरिकेतील बलाढ्य वाहन निर्मिती कंपनी जनरल मोटर्सने 2017 साली भारतातून काढता पाय घेतला. पुण्यातील तळेगाव येथे कंपनीचा वाहन निर्मिती प्रकल्प होता. हा प्रकल्प कंपनीने बंद केल्याने दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी बेरोजगार झाले. कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याचे कंपनीने दावा केला असला तरी कर्मचाऱ्यांनी लढा सुरूच ठेवला आहे.
जनरल मोटर्सच्या माजी कर्मचाऱ्यांनी साखळी पद्धतीने उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
तळेगाव येथील प्रकल्प कंपनीने 2017 साली बंद केला. तेव्हा कंपनीत एक हजारांपेक्षा जास्त परमनंट कर्मचारी होते. या सर्व कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या कर्मचाऱ्यांना कंपनीने आर्थिक मोबदला दिला. मात्र, हा आर्थिक मोबदला अपुरा असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच तळेगाव येथील प्रकल्प ज्या कंपनीला विकण्यात येईल, त्या कंपनीत कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.
माजी कर्मचाऱ्यांची मागणी काय?
अनेक वर्षांपासून हा तळेगाव येथील जनरल मोटर्सचा प्रकल्प बंद मात्र, सुस्थितीत होता. नुकतेच ह्युंदाई मोटर्सने हा प्रकल्प खरेदी केला आहे. प्राथमिक करारावर सह्या झाल्या असून अंतिम करार बाकी आहे. जनरल मोटर्सच्या बेरोजगार कर्मचाऱ्यांना ह्युंदाई मोटर्समध्ये सामावून घ्यावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. तसा समावेश कंपनी खरेदी करारात करावा, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, तसे झाले नाही.
कंपनीची बाजू काय?
तळेगाव येथील प्रकल्प बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना कायदेशीर नियमापेक्षा सात पट आर्थिक मोबदला दिल्याचे कंपनीने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र, कर्मचाऱ्यांनी हे पॅकेज घेण्यास नकार दिला. कर्मचाऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्याचा प्रयत्न कंपनीने केला, असे जनरल मोटर्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी माजी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध खटला भरला होता. निवृत्तीनंतरचे फायदे आणि वेतन न दिल्याचा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे. तसेच दुसऱ्या कंपनीत सामावून घेण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे. ती कंपनीकडून मान्य करण्यात आली नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयातही गेले आहे. मात्र, अद्याप काहीही तोडगा नाही.