गपपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी सर्व गणेश भक्तांची तयारीही सुरू झाली आहे. तसेच गणेशोत्सवासाठी (Ganesh festival) प्रशासनाकडूनही पूर्व नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे आता फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आतुरता लागली आहे. मात्र यंदा गणपती बाप्पाचे आगमन हे खिशाला थोडे महाग पडणार आहे. कारण यंदा गणेश मूर्तीच्या (Ganesh Statue) किमतीमध्ये जवळपास 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. मूर्ती तयार करण्यासाठी येणाऱ्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने गणेश मूर्तीचे दर वाढणार असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे.
गणेश मूर्तींचा उत्पादन खर्च वाढला-
यंदा 19 सप्टेंबरला गणपतीचे आगमन होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घरोघरी गणेश उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे गणेशमू्र्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर अनेक गणेश मूर्ती कारागीरांनी मूर्ती तयार सुरुवात केली आहे. मात्र, यंदाच्यावर्षी गणेश मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे. कारण गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) किमतीवर 18% जीएसटी लागू झाला आहे. तसेच ऑईल पेंटच्याही किमतीमध्ये मोठ्या जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच कारागीरांचा मोबदाला ही वाढला आहे. त्यामुळे गणेशमूर्तीचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी यंदा गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये सुमारे 20% वाढ होणार असल्याचे कारागीरांचे मत आहे.
रंगाच्या किमतीमध्ये वाढ
महाराष्ट्रात पेन, पालघर, कोल्हापूर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती निर्मितीचे कारखाने आहेत. पीओपीच्या मूर्ती टिकाऊ असल्याने त्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यासाठी हे मूर्तीकार गुजरातमधून पीओपी मागवतात. मात्र, सध्या तिथे सुरू असलेल्या पावसामुळे त्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. शिवाय त्यावर 18%जीएसटी आकारला जातो. रंगाच्या किमतीही गेल्या वर्षी 1,000 रुपयांपेक्षा कमी होत्या. मात्र यंदा बाजारात 1,200 ते 1,400 रुपयांपर्यंत रंगासाठी पैसे माजावे लागत असल्याची माहिती कोल्हापुराती गणेश मूर्तीकारांनी दिली आहे. केवळ कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मूर्तींच्या किमतीत २० टक्क्यांपर्यंत वाढ कराव्या लागत असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे.