भारतीय लोक उत्सव प्रिय आहेत. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांचे अर्थकारण हे सण उत्सवावर अवलंबून राहते. त्याचप्रमाणे गौरी गणपती उत्सवाच्या काळात इतर व्यावसायिकांप्रमाणे टेलरिंग व्यवसायालाही सुगीचे दिवस प्राप्त होत आहेत. अनेक सार्वजनिक गणेश मंडळाकडून उत्सावानिमित्त मंडळाच्या सदस्यांसाठी पारंपरिक पोशाख शिवून घेतले जातात, त्यामुळे टेलरिंग व्यवासायात (tailoring business) असणाऱ्या अनेकांना रोजगार उपलब्ध होत असून या काळात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. कशा प्रकारे गणेशोत्साचा टेलरिंग व्यवसायाला फायदा होतो याबाबतचा आढावा जाणून घेऊयात
Table of contents [Show]
सार्वजनिक मंडळे आणि कार्यकर्ते
आपल्याकडे गणेशोत्सव (Ganesh Festival) हा सार्वजनिक पद्धतीने साजरा केला जात असल्याने या उत्सवामध्ये समाजातील अनेक घटक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. विशेषत: तरुणाईचा यामध्ये मोठा सहभाग असतो. गावोगावी आणि शहरी भागात अशा प्रकारे सार्वजनिक गणेशत्सोव साजरा करण्याऱ्या मंडळाची संख्या देखील मोठी आहे. तसेच प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांची संख्या देखील 50 ते 200 च्या आसपासच असते. दरम्यान, उत्सवावेळी मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबीर, अन्नदान यासारख्या सामाजिक उपक्रमासह मिरवणुकीमध्ये मंडळातील एकी दिसून येते. अशा कार्यक्रमावेळी कार्यकर्त्याना एक सारखा पोशाख असावा यासाठी अनेक मंडळे आग्रही असतात. त्यामुळे बहुतांश मंडळांकडून आपल्या मंडळातील पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांना एकाच प्रकारचा पारंपरिक पोशाख शिवण्यावर भर दिला जातो. .
हजारो ड्रेस शिवण्याच्या ऑर्डर-
गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांकडून आपल्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी ड्रेसची ऑर्डर एक महिन्यापूर्वीच दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने विजार पायजमा अशा प्रकारचे पारंपरिक ड्रेस शिवण्यावर भर दिला जातो. ग्रामीण भागात किमान 100 ते 150 ड्रेसची एका एका मंडळाची, तर शहरी भागात एका एका मंडळाकडून 250 ते 500 ड्रेसची ऑर्डर दिली जाते. त्यामुळे गणेश उत्सव काळात ड्रेस शिवण्याची ही ऑर्डर हजारोच्या संख्येत जाते. या काळात शहरी अथवा ग्रामीण भागातील टेलरिंग व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात कपड्यांच्या ऑर्डर उपलब्ध होतात.
प्रति ड्रेस 500 ते 1000 रुपये शिलाई
सध्या महागाई वाढल्याने शिलाईचे साहित्यही महाग झाले आहे. तसेच शिलाई काम करणाऱ्या कामगारांची मजुरी देखील वाढली आहे. परिणामी ड्रेस शिवण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शिलाईच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत असल्याने ट्रेलर्सकडून प्रति ड्रेससाठी 500 रुपये ते 1000 रुपयांपर्यंतचे शिलाईचे दर आकारले जात आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात टेलरिंग व्यावसायिकांचा वर्षभराच्या तुलनेत जास्त व्यवसाय हा गणेशोत्सव काळात होत असून उत्सव काळात लाखोंची उलाढाल होत आहे.
अनेकांना रोजगार
गणेश उत्सावानिमित्त ड्रेसच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्याने आणि त्या वेळेत पूर्ण करून द्यायच्या असतात. त्यामुळे कपड्यांच्या ऑर्डर घेणारे ट्रेलर व्यावसायिक अधिकचे कामगार लावून कपड्याची वेळेत डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक शिलाई कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्यामध्ये बटन बसवणारे, काज्या तयार करणारे, यासह कपडे इस्त्री करणारे कारागिर अशा अनेक कारागिरांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. तसेच या काळात टेलरिंग साहित्य विकणाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात साहित्याच्या ऑर्डर मिळतात. त्यामुळे एकूण गणेशोत्सव काळात एका ट्रेलरची किमान 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीची उलाढाल होते.
कापड दुकानदारांचा फायदा
प्रत्येक गणेश मंडळे आपल्या कार्यकर्त्यांसाठी आकर्षक पोशाख शिवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कापड दुकानदारांचाही मोठ्या प्रमाणात खप होतो. ड्रेसची संख्या जास्त असल्याने या काळात कपड्यांचे तागे मोठ्या प्रमाणात विकले जातात. या काळात कापड दुकानदारांची देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.