स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्या OMG 2 सिनेमाचे थेट आव्हान असताना देखील गदर 2 सिनेमाने आतापर्यंत 300 कोटींचे उत्पन्न कमावले आहे.
गदर 2 सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हा सिनेमा उत्तर भारतात प्रेक्षकांना थिएटरवर खेचून आणण्यात यशस्वी झाला आहे. रिलीजपासून सलग 6 दिवसांत 300 कोटींचा कमाईचा टप्पा पार करणारा गदर 2 हा अलिकडचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे.
गदर 2 ने अॅडव्हान्स बुकिंगचेही रेकॉर्ड मोडले आहेत. यामुळे मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन थिएटरवाल्यांना संजिवनी मिळाली आहे. एका पोर्टलनुसार सातव्या दिवशी गदर 2 साठी 3 लाख 13 हजार 30 तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले होते. बुकमायशो या वेबपोर्टलवरुन आतापर्यंत गदर 2 सिनेमाची 45 लाख तिकिटे विक्री करण्यात आली आहेत.
गदर 2 च्या एंट्रीनंतर काहीसा पिछाडीवर पडलेल्या OMG 2 सिनेमाने रिलीजच्या दिवशी 10 कोटी 26 लाख रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 15 कोटी 30 लाख, तिसऱ्या दिवशी 17 कोटी 55 लाख, चौथ्या दिवशी 12 कोटी 6 लाख आणि पाचव्या दिवशी 17 कोटी 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. सहाव्या दिवशी 7 कोटी 75 लाख आणि सातव्या दिवशी 6 कोटी 20 लाख रुपयांची कमाई केली.
गदर- एक प्रेम कथा हा सिनेमा 2001 मध्ये हिट ठरला होता. एक भारतीय ट्रक ड्रायव्हर आपली पत्नी आणि मुलगा यांची पाकिस्तानातून सुटका करतो असे कथानक होते. गदर 2 मध्ये त्यापुढील कथा मांडण्यात आली आहे. सनी देओलचा पाकिस्तानातील संघर्ष आणि सुटकेचा थरार या सिनेमात दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा आणखी काही दिवस थिएटर गाजवेल, असे बोलले जाते.
गदर 2 ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई
गदर 2 सिनेमाने रिलीजच्या दिवशी 40 कोटी 10 लाख रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 43 कोटी 08 लाख, तिसऱ्या दिवशी 51 कोटी 70 लाख, चौथ्या दिवशी 38 कोटी 70 लाख रुपयांची कमाई केली. 15 ऑगस्ट 2023 रोजी या सिनेमाचे अनेक मल्टिप्लेक्समध्ये हाऊसफूल शो झाले. मंगळवारी पाचव्या दिवशी सिनेमाने तब्बल 55 कोटी 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. सहाव्या दिवशी 7 कोटी 75 लाख आणि सातव्या दिवशी 6 कोटी 20 लाख रुपयांची कमाई केली.
गदर 2 आणि OMG 2 मध्ये स्पर्धा
गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दोन बडे अभिनेते एकमेकांसमोर आले. सनी देओलचा गदर 2 रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेला OMG 2 प्रदर्शित झाला होता. गदर 2 आणि OMG 2 यामध्ये मागील आठवड्यापासून स्पर्धा सुरु झाली. पहिल्या आठवड्यात कमाईच्या बाबतीत गदर 2 ने OMG 2 ला पछाडले आहे. OMG 2 दोन आठवड्यात 100 कोटींची कमाई केली आहे. तर गदर 2 सिनेमाने अवघ्या 6 दिवसांत 300 कोटींची कमाई केली.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            