देशातील बँकांना बुडीत कर्जांनी हैराण केलेले असतानाच बँकांमधील आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बँकांमध्ये 9102 फ्रॉडची नोंद झाली असून यात बँकांचे 60389 कोटी अडकल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आली आहे.
RBI च्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये फ्रॉड वाढले असले तरी त्यातील रक्कम मात्र निम्म्याने कमी झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बँकांमधून 7358 फसवणुकीच्या घटनांची नोंद झाली होती. यात बँकांना 1.37 लाख कोटींचा फटका बसला होता. तर कोरोना पूर्वीच्या वर्षात बँकांमध्ये 8702 फ्रॉडची नोंद झाली होती. त्यात बँकांचे 1.85 लाख कोटी बुडाले होते.
गेल्या आर्थिक वर्षात गुन्हेगारांची किंवा हॅकर्सची फ्रॉड करण्याची पद्धत बदलली असल्याचे निरिक्षण रिझर्व्ह बँकेने नोंदवले आहे. कर्जाशी संबधित फसवणुकीच्या घटना कमी झाल्या. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कर्जाशी संबधित 1112 फ्रॉडच्या घटना घडल्या. त्यातून 6042 कोटी बुडाले. त्याआधीच्या वर्षात 2020-21 मध्ये कर्जांबाबत 1477 फ्रॉड घडले होते त्यातून 14973 कोटींची फसवणूक झाली होती.
खासगी बँकांमधील आर्थिक फसवणुकीच्या घटनांची संख्या अधिक असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी खासगी बँकांमधील फ्रॉड् वाढले. मात्र या फसवणुकीच्या घटनांमधील एकूण रकमेचा विचार केला तर सरकारी बँकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत 5406 फसवणुकीच्या घटनांची नोंद झाली आहे. यात बँकांना 10485 कोटी बुडाले आहेत. गेल्या वर्षी याच सहामाहीत बँकांचे फ्रॉडमुळे 36136 कोटींचा फटका बसला आहे.