• 04 Oct, 2022 15:04

मित्रांनी यशस्वी करून दाखवलेले ‘स्टार्टअप’

Friendship Day 2022

Friendship Day 2022 : आयुष्यात दोन प्रकारची श्रीमंती मानली जाते. एक ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे; आणि दुसरा ज्याच्याकडे भरपूर मित्र आहे. आजच्या वर्ल्ड फ्रेंडशिप डे(World Friendship Day) निमित्त आपण पैसा आणि मैत्री अशा दोन्हीं गोष्टींनी श्रीमंत असलेल्या मित्रांबद्दल जाणून घेणार आहोत.

एक प्रचलित म्हण आहे, ‘तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य (Personal & Professional Life) हे एकत्र करू नका!’ पण ही म्हण सध्याच्या युगात काही यशस्वी नवउद्योजकांनी (Successful Startups) चुकीची ठरवली आहे. मित्रांसोबत एखादी कंपनी किंवा व्यवसाय सुरू करणं ही कल्पनाच बऱ्याच जणांना पटणारी नव्हती. त्याला कारणंही तशीच होती. कारण मैत्रांसोबतचं वागणं, बोलणं आणि एकूणच सर्व गोष्टी या थट्टा-मस्करीपुरत्या सिमित होत्या. अर्थात यालाही काही अपवाद होते. पण सध्या काळात मित्रांसोबत एका सिरियस नोटवर कंपनी किंवा व्यवसाय सुरू करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पण काही मित्रांनी हे शिस्तीनं आणि नेटानं करून दाखवलं. तर आज (दि. 7 ऑगस्ट, 2022) आपण वर्ल्ड फ्रेंडशिप डे (World Friendship Day)च्या निमित्ताने अशाच काही मित्रांनी स्थापन केलेल्या यशस्वी कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत. (Friendship Day 2022)

फ्लिपकार्ट : सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल

Flipkart founder sachin bansal & binny bansal
Photo Source

सचिन आणि बिन्नी या दोघांचे आडनाव बन्सल आहे. म्हणून तुम्हाला वाटेल की, ते सख्खे किंवा चुलत भाऊ असतील. पण ते तसे नाही. ते तर मित्र आहेत आणि त्यांचे आडनाव एकच असणं हा फक्त एक योगायोग आहे. हे दोघेही चंदीगड शहरामधून असून त्यांनी आयआयटी दिल्ली (IIT Delhi) मधून शिक्षण घेतलं आहे. शिक्षणानंतर त्यांनी एकाच टीममध्ये अॅमेझॉनमध्ये (Amazon) काम केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ची फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनी सुरू केली. जी आज ई-कॉमर्स बिझनेसमध्ये टॉपच्या यादीत आहे. ऑक्टोबर, 2007 मध्ये सुरू झालेली फ्लिपकार्ट कंपनी आज भारतातील लिडिंग ई-कॉमर्स कंपनी ठरली.

रेडबस : फणींद्र साम, सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्मराजू

RedBus Phanindra sama, sudhakar pasupunuri, chanran padmaraju
Photo Source 

फणींद्र, सुधाकर आणि चरण या तीन मित्रांनी बिट्स पिलानी (BITS Pilani) या इन्स्टिट्यूटमधून एकत्र शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवस ते बंगळुरूमध्ये एकाच फ्लॉटमध्येही राहिले होते. या तिघांनी रेड बस (Red Bus) सुरू करण्यापूर्वी वैयक्तिक पातळीवर चरण पद्मराजू हनीवेलसाठी (Honeywell), सुधाकर पासुपुनुरी आयबीएमसाठी (IBM) आणि फणींद्र साम टेक्सास इन्स्ट्रूमेंट्ससाठी (Texas Instruments) काम करत होता.

स्नॅपडील : कुणाल बहल आणि रोहित बन्सल

Snapdeal Kunal Bahal rohit bansal
Photo Source

कुणाल बहल आणि रोहित बन्सल हे दोघे लहानपणापासूनचे मित्र, एकत्रच शाळेत जात होते. शालेय शिक्षणानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना या दोघांची ताटातूट झाली. याचे कारण असे की, रोहितला इथल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला म्हणून त्याने भारतात राहून शिक्षण घेण्याचे ठरवले. तर कुणाल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला. या दोघांनी लहाणपणापासूनच एकत्र बिझनेस करायचा असं ठरवलं होतं. ते त्यांनी आपापल्या क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर करून दाखवलं आणि 4 फेब्रुवारी, 2010 रोजी स्नॅपडील ई-कॉमर्स कंपनी सुरू केली.

झोमॅटो : दीपंदर गोयल आणि पंकज चड्डा

Zomato Deepinder goyal & pankaj chaddah
Photo Source

2008 मध्ये दीपंदर गोयल आणि पंकज चड्डा या दोन मित्रांनी फूडीबे (FoodieBay) या नावाने कंपनी सुरू केली होती; जी आता झोमॅटो (Zomato) म्हणून ओळखली जाते. या दोघांनीही आयआयटी दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बेन अॅण्ड कंपनीमध्ये (Bain & Company) एकत्र काम करत होते; तेव्हा ते एकमेकांचे चांगले मैत्र झाले आणि त्यानंतर त्यांनी झोमॅटो सुरू केलं.

द पेपियर प्रोजेक्ट : आयेशा आणि सना

the papier project ayesha & sanaa
Photo Source

आयेशा आणि सना या दोघींची पहिली भेट हिल अॅण्ड बकल (Heel & Buckle) या कंपनीत झाली होती. आयेशा या कंपनीत ई-कॉमर्स तर सना पीआर आणि मार्केटिंग विभाग सांभाळत होती. या दोघींची या कंपनीमध्ये चांगलीच गट्टी जमली आणि दोघींनी मिळून द पेपियर प्रोजेक्ट (The Papier Project) स्वतःची फर्म सुरू केली.

वर माहिती घेतलेल्या स्टार्टअपमधून आपल्या हे लक्षात आले असेल की, मैत्री ही फक्त शाळा, कॉलेजपुरती किंवा धमालमस्ती करण्यापरती मर्यादित नाही. तर चांगल्या मित्रांच्या मदतीने आणि सहवासाने आपण केवढी मोठी झेप घेऊ शकतो. हे यावरून स्पष्ट होते. तर तुम्हीही तुमची मैत्री अशीच जोपासा, वाढवा आणि तिला एका वेगळ्या उंचीवर न्या, याच आजच्या वर्ल्ड फ्रेंडशिप डे (World Friendship Day)च्या शुभेच्छा!