राज्य शासनाकडून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेसाठी रावबण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या (MJPJAY) निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आता यापुढे Mahatma jyotiba Phule Jan Arogya Yojana अंतर्गत राज्यातील सर्व प्रकारच्या रेशनकार्डधारक कुटुंबांना उपचार खर्चाचे विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे. तसेच या योजनेतील लाभार्थी कुटुंबांना देण्यात येणाऱ्या विमा संरक्षणाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या निर्णयाचा राज्यातील जनतेला आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.
योजनेचे यापूर्वीचे स्वरूप
सर्व सामान्य कुटुंबाला आजारपण उद्भवल्यास मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत आरोग्य योजना सुरू करण्यात आल्या. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गंभीर आजारावरील उपचार देखील विविध रुग्णालयातून मोफत करण्याची सुविधा प्राप्त झाली. यापूर्वी ही योजना पिवळे, केशरी रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना या नागरिकांसाठी उपलब्ध होती. थोडक्यात ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे, अशा नागरिकांना या आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळत होता. या योजनेतंर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षाला 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण दिले जात होते. तसेच गंभीर आजारासाठी 2.5 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जात होते. मात्र आता या योजनेत बदल करण्यात आले आहेत.
सर्वांसाठी आरोग्य विमा संरक्षण
राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आता राज्यातील सर्व रेशनकार्ड धारक, रहिवासी प्रमाणपत्र असणाऱ्या नागरिकांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच नागरिकांना आता सरकारच्या आरोग्य विमा योजनेतून मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे. केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाच्या या निर्णयाचा शासन निर्णय 28 जुलै 2023 ला जारी करण्यात आला आहे.
विमा संरक्षणाची रक्कम आणि उपचाराच्या संख्येत वाढ-
राज्य शासनाच्या या आरोग्य योजनेच्या रकमेत देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 1.5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येत होते. मात्र, नवीन शासन निर्णयानुसार राज्यातील रहिवासी कुटुंबास प्रतिवर्षी तब्बल 5 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे. तसेच सरकारने या योजनेत ज्या उपचाराची वारंवार आवश्यकता पडत नाही असे तब्बल 181 उपचार वगळून मागणी असलेले 328 उपचारांचा समावेश केला आहे. याबरोबरच रस्ते अपघातामधील उपचारांच्या संख्येत वाढ करून 184 करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना आता केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ घेता येणार आहे.
सर्पदंशावरील उपचाराचाही समावेश-
याच बरोबर राज्याच्या आरोग्य विभागाकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आता सर्पदंश आणि अपेंडिक्स या सारख्या उपचारांची तरतूद देखील या विमा योजनेत केली जाणार आहे.