Fraud calls: क्रेडिट कार्ड किंवा विमा पॉलिसी घ्या, ऑनलाइन कर्ज घ्या तेही काही मिनिटांत, असे एक ना अनेक कॉल्स तुम्हाला आले असतील. मात्र, सावधान, यातील अनेक कॉल्स हे बनावट असतात. खात्री केल्याशिवाय कोणालाही फोनवर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँकेसंबंधीत माहिती OTP देऊ नका. भारतामध्ये फेक कॉल्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या केंद्रस्थानी बँकिंग आणि फायनान्शिअल सेवा हे क्षेत्र आहे.
बनावट कॉल सेंटर्सद्वारे फेक कॉल (Fraud calls) येण्याचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढतच आहे. दुसऱ्या राज्यातून फोन येत असल्यामुळे तक्रारीही सहसा दाखल होत नाहीत. साध्या भोळ्या नागरिकांची अशा कॉल्सद्वारे फसवणूक होते. डिजिटल क्षेत्रातील फ्रॉड या क्षेत्रात काम करणाऱ्या CloudSEK या कंपनीने यासंबंधी तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
कंपन्यांची नावे, लोगो, बनावट साइट्स, मेल्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. आर्थिक फसवणूक करण्याचा मुख्य उद्देश या फोन कॉल्समागे असतो. धक्कादायक बाब म्हणजे ज्या नंबरवरुन तुम्हाला फेक कॉल येतात, त्यातील 80% नंबर अद्यापही सुरू आहेत. म्हणजेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. फेक कॉल करणाऱ्यांना कारवाईची भीती राहिली नसल्याने हे नंबर चालू आहेत. खासगी कंपन्यांचे सीमकार्ड वापरुन बनावट कॉल सेंटर्सही दिल्लीसारख्या शहरात चालवले जातात. पोलिसांकडून कारवाईही होते. मात्र, हे रॅकेट मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने बँकिंग आणि आरोग्य क्षेत्रासंबंधी सर्वाधिक फेक कॉल नागरिकांना येतात.
क्रेडिट कार्ड, अकाऊंट एक्सपायरी, बँक लोन, KYC, अकाऊंट क्लोजर, बॅलन्ससंबंधीत सर्वाधिक फेक कॉल्स ग्राहकांना येतात. तसेच बनावट विमा कंपन्यांकडूनही ग्राहकांना फोन येतात. काही फेक कस्टमर केअर रॅकेट चालवणारे आघाडीच्या कंपन्यांचे लोगो, वेबसाइट वापरुन ग्राहकांची दिशाभूल करतात.
बनावट कॉलपासून कसे वाचू शकता? (How to stop Fraud Call)
कॉलर आयडी चेक केल्याशिवाय तुमची कोणतीही माहिती देऊ नका. कॉलर आयडी चेक करण्यासाठी अनेक अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. फोनद्वारे नंबरची खात्री केल्याशिवाय कोणतीही संवेदनशील माहिती देऊ नका. OTP कोणासोबतही शेअर करू नका. नंबरच्या बाबतीत शंका आल्यास कॉल रिसिव्ह न केलेलेच बरे. सतत एकाच नंबरवरुन येणारे कॉल्स तुम्ही ब्लॉक किंवा Do not disturb (DND) लिस्टमध्ये टाकू शकता.