Foreign portfolio investment Outflow: परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय भांडवली बाजारातून माघार घेतल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात 10 हजार कोटी रुपये काढून घेतले. तर मागील एका आठवड्यात सुमारे साडेचार हजार कोटी रुपये काढून घेतले.
गुंतवणूक काढून घेण्यामागील कारणे काय?
अमेरिकेतील वाढते व्याजदर, मंदीसदृश्य परिस्थिती आणि स्थानिक कंपन्यांचे उच्च मुल्यांकन ही गुंतवणूक काढून घेण्यामागील प्रमुख कारण आहेत. अमेरिका सरकारच्या बाँडमधून चांगला परतावा मिळत असल्याने परदेशी गुंतवणुकदार त्याकडे आकर्षित झाले आहेत. अमेरिकन फेडरल बँकेने वर्ष संपण्याआधी पुन्हा एकदा दरवाढ करण्याचे सुतोवाच दिले आहेत. त्यामुळेही भारतातील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे.
मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्याच्या कालावधीत परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय भांडवली बाजारात गुंतवणुकीचा सपाटा लावला होता. 1.74 लाख कोटी रुपये भारतीय बाजारात लावले होते. मात्र, आता हा ओघ कमी झाला आहे. आर्थिक उलाढाल, कंपन्यांचे योग्य मुल्यांकन आणि परदेशी गुंतवणुकीस सरकारी सहकार्य मिळाल्यास परदेशी गुंतवणूक वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ऑगस्टमध्ये सर्वाधिक परदेशी गुंतवणूक
ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूक सर्वात कमी 12,262 कोटी रुपये झाली. मंदी, अमेरिकेतील वाढते व्याजदर यासह इतरही अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणुकदार भारतासारख्या उभरत्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास धजावत नाहीयेत. वाढते इंधनाचे दरही गुंतवणूक बाहेर जाण्यामागील एक कारण आहे.
चीन तसेच इतर विकसनशील देशांच्या बाजारापेक्षा भारताची विकासदर आणि अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी मजबूत राहील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत परदेशी गुंतवणूक पुन्हा माघारी येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कोणत्या क्षेत्रातून सर्वाधिक गुंतवणूक काढून घेतली?
15 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, खाणकाम, ऊर्जा, सेवा, खनिजतेल, टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रांतून सर्वाधिक गुंतवणूक काढून घेतली. तर आर्थिक सेवा, फूड, ग्राहक सेवा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात परदेशी गुंतवणुकदारांनी पैसे लावले.