Vedanta-Foxconn deal: भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प गुजरात राज्यामध्ये उभा राहणार होता. हा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी अनेक राज्ये उत्सुक होती. मागील वर्षी महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला गेला होता. मात्र, आता या प्रकल्पातून तैवानची सेमीकंडक्टर निर्मितीतील आघाडीची कंपनी फॉक्सकॉन बाहेर पडली आहे. संयुक्त उपक्रमातून (ज्वॉइंट व्हेंचर) बाहेर पडत असल्याचे कंपनीने काल (सोमवार) अधिकृत रित्या जाहीर केले.
2 लाख रोजगार निर्मिती होणार होती
वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पाचा देशात मोठा गाजावाजा झाला होता. त्यामागे कारणही तसेच होते. हा प्रकल्प 1 लाख 54 हजार कोटींचा होता. या माध्यमातून देशात 2 लाख रोजगार निर्मिती होणार होती. (Foxconn pulls out of vedanta deal) तसेच सेमीकंडक्टर उद्योगाला बळ मिळणार होते. मात्र, आता या प्रकल्पातून फॉक्सकॉन कंपनी बाहेर पडली आहे. सेमीकंडक्टर उत्पादनास केंद्र सरकार अनुदान आणि योजनांचा लाभ देते. त्याअंतर्गत भारतामध्ये उत्पादनाची निर्मिती करू, असे फॉक्सकॉनने म्हटले आहे. त्यासाठी लवकरच सरकार दरबारी अर्ज करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
महाराष्ट्रातील राजकारण तापवणारा प्रकल्प
फॉक्सकॉन प्रकल्प मिळवण्याच्या स्पर्धेत तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य होते. यापैकी महाराष्ट्रात प्रकल्प उभा राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि फॉक्सकॉन-वेदांता कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र, सप्टेंबर 2022 ला अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला.
गुजरातमध्ये प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा दोन्ही कंपन्यांनी केली होती. मात्र, तेव्हा राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले होते. महाराष्ट्रातून प्रकल्प गेल्यामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. तर हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार असतानाच हातातून गेला होता, असे शिंदे-फडणवीस सरकारने म्हटले होते.
सेमीकंडक्टर चीप निर्मितीमध्ये अमेरिका, चीन आणि तैवान आघाडीवर आहेत. भारतामध्ये अद्याप या तंत्रज्ञानाचा आणि उद्योगांचा विकास व्हायचा आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरू केले असताना प्रकल्प अचानक गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता वेदांना प्रकल्पउभारणीत दुसरा पार्टनर शोधत आहे.