Apple साठी iPhone निर्माण करणारी कंपनी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट (FII) कर्नाटक राज्यात प्लांट उभा करणार आहे. यासाठी तब्बल 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कर्नाटकातील देवनहल्ली येथील आयटी पार्कमध्ये हा मोबाईल निर्मिती प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटकचे उद्योग मंत्री एम.बी.पाटील यांनी दिली. या संदर्भात कर्नाटक सरकार आणि फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट कंपनीचे सीईओ ब्रँड चेंग यांच्या सोबत बैठकीही पार पडली आहे.
14000 रोजगार निर्मिती-
फॉक्सकॉनची (Foxconn) उपकंपनी एफआयआयने या प्रस्तावांतर्गत 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. यामुळे 14,000 नोकऱ्या निर्माण होतील. प्रकल्पासाठी सुमारे 100 एकर जमीन लागणार आहे. यासाठी कर्नाटक सरकार जिल्हा मुख्यालय तुमाकुरू येथील जपान इंडस्ट्रियल टाउनशिपची जागा देण्यासंदर्भात विचाराधीन आहे. फॉक्सकॉनकडून आय-फोन (iPhone) निर्मितीसह मोबाईलसाठी आवश्यक असणारे इतर स्पेअरपार्ट देखील तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये स्क्रीन आणि बाह्य आवरणाचा समावेश असेल.
एप्रील 2024 पर्यंत उत्पादन सुरू
फॉक्सकॉन कंपनीकडून पुढील वर्षी एप्रिलपर्यंत प्लांटमध्ये उत्पादन सुरू करण्याची योजना आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकार सर्वस्तरावर मदत करत आहे. ज्यामुळे कर्नाटक मध्ये हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. गेल्या तीन वर्षांत दोड्डाबल्लापुरा तालुक्यात तीन उद्योग आले आहेत. ज्यांनी सुमारे 110 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि सुमारे 1,450 नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, अशी माहितीही कर्नाटकचे उद्योगमंत्री पाटील यांनी दिली आहे.