शेअर बाजारातील घसरणीने गुंतणूकदारांना जबर फटका बसला आहे. मागील चार सत्रात सेन्सेक्सने 1950 अंकांची घसरण झाली. या पडझडीत गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटींचे नुकसान झाले. शुक्रवारी सेन्सेक्स 980 अंकांनी कोसळला होता.
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्याशिवाय जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे लॉकडाउनचे संकट गडद बनले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदर वाढ अटळ असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याज दरवाढीचे सत्र सुरुच राहील, असे बँकेने म्हटले आहे. त्याचा परिणाम उदयोन्मुख बाजारांवर झाल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
शुक्रवाच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात प्रत्येक सहा पैकी पाच शेअर घसरले होते. यात लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप अशा सर्वच गटातील शेअर्सला फटका बसला. चार सत्रात सेन्सेक्समध्ये 1950 अंकांची घसरण झाली आहे. यामुळे चार सत्रात बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल 11.76 लाख कोटींनी कमी झाले असून ते 276.14 लाख कोटी इतके खाली आले आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 980 अंकांच्या घसरणीसह 59845 अंकांवर विसावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 320 अंकांच्या घसरणीसह 17806 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्सने 60000 अंकांची पातळी तोडली. निफ्टी 18000 अंकांच्या पातळीखाली घसरला.
अमेरिकेतील शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली होती. त्याचे पडसाद भारतात उमटल्याचे बोलले जाते. चीनमधील कोरोनोचे दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. त्यामुळे जगभरातील वस्तूंच्या पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतात देखील केंद्र सरकारने तातडीची बैठक घेऊन राज्यांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
महागाई वाढणार
रशिया आणि युक्रेन युद्ध मागील 10 महिन्यांपासून सुरु आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही तोच आता कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. शुक्रवारी कमॉडिटी बाजारात क्रूड ऑईलचा भाव 1.1% ने वधारला आणि तो 81.86 डॉलर इतका झाला. लॉकडाउनच्या अनिश्चिततेने क्रूडच्या मागणीत वाढ झाली आहे. येत्या काळात क्रूडचा भाव 83.50 डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. ज्यामुळे महागाईचा पारा आणखी वाढू शकतो.